पिंपरी-चिंचवड शहरातील शाश्वत वाहतुकीसाठी कोणती उपाययोजना करता येईल, या हेतूने आयोजित कार्यशाळेत बराच गोंधळ झाला. चुकीच्या पध्दतीने ‘बीआरटी’ राबवण्यात येत असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवला. बीआरटी सुरू करताना सुरक्षिततेचा विचार झालेला नाही, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो, तसेच अपघातांचे सत्रही होत राहील, अशी भीतीही सदस्यांनी कार्यशाळेत व्यक्त केली.
पिंपरी पालिका व आयटीडीपीच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीत ‘सिट्रस’ येथे झालेल्या कार्यशाळेचे उद्घाटन उपमहापौर राजू मिसाळ व स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. आयुक्त राजीव जाधव, पक्षनेत्या मंगला कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, गटनेते सुलभा उबाळे, अनंत कोऱ्हाळे, सुरेश म्हेत्रे, नगरसेवक प्रशांत शितोळे, शमीम पठाण, सीमा सावळे, प्रसाद शेट्टी, विनायक गायकवाड, शत्रुघ्न काटे, राजेंद्र जगताप, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रवीण अष्टीकर, ‘आयटीडीपी’चे हर्षद अभ्यंकर, प्रांजली देशपांडे आदी उपस्थित होते.
आयुक्तांनी कार्यशाळेची संकल्पना स्पष्ट केली. त्यानंतर, भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयाचे माजी सहसचिव संजीवकुमार लोहिया यांनी मार्गदर्शन सुरू केल्यानंतर उपस्थित नगरसेवकांनी अनेक शंका उपस्थित केल्या. बीआरटीला विरोध नाही, मात्र ज्या पध्दतीने व सक्तीने हा प्रकल्प राबवण्यात येतो आहे, तो चुकीचा व घातक आहे, सुरक्षेविषयक विचार झालेला नाही, बीआरटी सुरू होण्यापूर्वीच जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे, कोटय़वधींचा प्रकल्प राबवताना पादचाऱ्यांचा कोणताही विचार झालेला नाही, या मुद्दय़ांकडे लक्ष वेधत सदस्यांनी आरटीओ, वाहतूक पोलीस तसेच महापालिकेला उद्देशून तिखट शेरेबाजी केली. वाहतूक पोलीस हप्ते घेतात, असा आरोपही पोलीस अधिकाऱ्यांसमोरच केला. गोंधळ होत असल्याचे पाहून आयुक्तांनी मध्यस्थी करत खुलाशाचा प्रयत्न केला. मात्र, सदस्य आपल्या म्हणण्यावर ठाम होते. या वेळी श्रेया गाडेपल्ली यांनीही सादरीकरण केले. शाश्वत वाहतूक व्यवस्थेवर आधारित लघुपटही दाखवण्यात आला.
‘बीआरटीसाठी पदपथ काढणे चुकीचे’
संजीवकुमार लोहिया म्हणाले, बीआरटी चांगला प्रकल्प आहे, त्याचे व्यवस्थित नियोजन गरजेचे आहे. प्रत्येक सेंटिमीटरचा आराखडा असला पाहिजे. बीआरटीसाठी पदपथ काढणे चुकीचे वाटते. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘हॉकर्स झोन’ असले पाहिजेत. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पुणे-पिंपरी-चिंचवडचा समावेश असला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पिंपरीतील कार्यशाळेत बीआरटीवरून खडाजंगी
चुकीच्या पध्दतीने ‘बीआरटी’ राबवण्यात येत असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-07-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All party corporators opposes implementation of brt in wrong way