महापालिकेने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सूचनेनुसार एकदिवसाआड पाणीपुरवठा मान्य केला. त्यामुळे पाण्याची बचत झाली असून ते पुणेकरांच्या हक्काचे पाणी आहे. तरीही दौंड, इंदापूरसाठी पाणी देण्याचा निर्णय घेऊन पालकमंत्री आमच्यावर सूड उगवत आहेत, अशी टीका करत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पालकमंत्री गिरीश बापट यांना लक्ष्य करण्यात आले. पुणेकरांचे पाणी पालकमंत्र्यांना पळवू देणार नाही असेही सभेत सांगण्यात आले.
पालिका सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच हा विषय उपस्थित करण्यात आला. पुणेकरांच्या हक्काचे पाणी पळविण्याचा घाट घालणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांचा निषेध असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर सदस्यांची भाषणे झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बराटे म्हणाले की, पुणेकरांना गेल्या आठ महिन्यांपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातून पाण्याची बचत झाली आहे. त्यामुळे पुणेकरांचा हक्क असलेल्या पाण्यावर गदा आणू नये. काँग्रेसचे संजय बालगुडे म्हणाले, दौंड, इंदापूरला आपण जे पाणी पिण्यासाठी सोडले ते पाणी त्यांनी शेती व कारखान्यांसाठी वापरले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी सत्तेत नसताना अनेक वेळा पाण्यासाठी आंदोलने केली. मात्र त्या आंदोलनाचा त्यांना आता विसर पडला आहे.
राष्ट्रवादीचे अप्पा रेणुसे म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत जलतरण तलाव बंद व्हायला पाहिजेत. दौंड, इंदापूरला किमान पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे. दौंडला टँकरने वा रेल्वेने पाणी देण्याचे नियोजन करावे. सुभाष जगताप म्हणाले की, निसर्गाने आपल्याला इशारा दिला आहे. पाण्याच्या वाटपाचे व वापराचे नियोजन योग्य पद्धतीने करा. मुळशी धरणातून पुण्याला पाच टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी केली पाहिजे.
विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरिवद िशदे म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार एकदिवसाआड पाणीपुरवठा मान्य केला गेला. तरी ते दौंड, इंदापूरसाठी चौथे आवर्तन मागत आहेत याचे आश्चर्य वाटते. नगरसेवकांना सातत्याने पाण्यासाठी झगडावे लागत आहे. साडे सतरा टीएमसी पाणी आपण वर्षभरात शेतीला देत आहोत. या परिस्थितीत पालकमंत्री आमच्यावर सूड उगवत आहेत असे वाटत आहे. अतिरिक्त पाणी देण्यास आमचा विरोध नाही. सभागृह नेते शंकर केमसे म्हणाले की, महापौर तुम्ही पुणेकरांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमचे अभिनंदन. पालकमंत्र्यांना पुणेकरांचे भले करता येत नसले तरी त्यांनी वाईट काही करू नये. भाजपचे गटनेता गणेश बीडकर, मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ तसेच बाबुराव चांदेरे, दत्तात्रय धनकवडे, बाळा शेडगे, किशोर िशदे, राजू पवार यांचीही सभेत भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा