तीन आरोपी दोषी; माफीचा साक्षीदार मुक्त, आज शिक्षा सुनावणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात खळबळ उडवून देणाऱ्या संगणक अभियंता नयना पुजारी यांच्या खूनप्रकरणातील तीन आरोपींना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी सोमवारी दोषी ठरवले. खून, सामूहिक बलात्कार, अपहरण, जबरी चोरी, मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा कलमांखाली या आरोपींना न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. या खूनप्रकरणातील माफीच्या साक्षीदाराला मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, न्यायालयाकडून आरोपींवर दोषनिश्चिती करण्यात आल्यानंतर सरकार पक्षाकडून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असा युक्तिवाद मंगळवारी (९ मे) केला जाणार आहे. त्यानंतर आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल.

या खूनखटल्यात योगेश अशोक  राऊत (वय २४, रा. गोळेगाव, ता. खेड, जि. पुणे), महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड, जि. पुणे), विश्वास हिंदूराव कदम (वय २६, रा. दिघी, आळंदी रस्ता, मूळ रा. भुरकवाडी, ता. खटाव, जि. सातारा) अशी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्यातील माफीचा साक्षीदार राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, रा. गोळेगाव, ता. खेड, जि. पुणे) याची निदरेष मुक्तता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेली सात वर्ष नयना पुजारी खून खटल्याची सुनावणी सुरु होती. सरकार पक्षाकडून ३७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. सत्यम निंबाळकर, अ‍ॅड. हृषीकेश कांबळे यांनी साहाय्य केले. बचाव पक्षाकडून अ‍ॅड. बी. ए. अलुर, अ‍ॅड. रणजित ढोमसे-पाटील, अ‍ॅड. अंकुशराजे जाधव यांनी तेरा साक्षीदारांच्या  साक्षी नोंदविल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सोमवारी सकाळी आरोपी राऊत, ठाकूर, कदम यांना सकाळी अकराच्या सुमारास हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कारागृह प्रशासन आणि पोलिसांकडून आरोपींना हजर करण्यास सुमारे तासभर विलंब झाल्याने न्यायालयाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली.

विशेष न्यायाधीश येनकर यांच्या न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आल्यानंतर आरोपींच्या पिंजऱ्यात उभ्या केलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने पुढे बोलावले. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना अपहरण (भादंवि ३६६), सामूहिक बलात्कार (भादंवि ३७६ (ग)), खून (भादंवि ३०२), मृताच्या शरीरावर असणारा ऐवज चोरणे (भादंवि ४०४), कट रचणे (भादंवि १२० (ब)), जबरी चोरी (भादंवि ३९७) या कलमांखाली दोषी धरले. सरकार पक्ष तसेच बचाव पक्षाकडून केला जाणारा अंतिम युक्तिवाद ऐकून उद्या (९ मे) आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल, असे विशेष न्यायाधीश येनकर यांनी स्पष्ट केले.

देशात बलात्काराचे अनेक खटले प्रलंबित आहेत. अशा खटल्यांचा लवकर निपटारा झाल्यास पीडित महिलांना न्याय मिळेल. नयनाच्या खून खटल्याची सुनावणी लवकर होऊन आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी गेली सात वर्षे मी पाठपुरावा करत होतो. या खटल्यातील आरोपी योगेश राऊत पसार झाल्यानंतर मी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. पोलीस आयुक्तालयावर मोर्चादेखील काढला होता. या खटल्यातील आरोपींवर न्यायालयाकडून दोष निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना फाशीची शिक्षा योग्य ठरेल.

-अभिजित पुजारी (नयना पुजारीचे पती)

खटला उभा करण्यासाठी पोलिसांचे परिश्रम

नयना पुजारी खून खटल्यात येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. खटल्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे उभी करण्यासाठी हवालदार प्रकाश लंघे, सुनील कुलकर्णी, सचिन कदम यांनी परिश्रम घेतले. पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतरही पोलीस निरीक्षक सावंत यांनी सरकार पक्षाकडून साक्ष दिली. महत्त्वाच्या सुनावणीसाठी ते जातीने उपस्थित राहायचे. सावंत म्हणाले की, या खटल्यात आरोपींना फाशीची शिक्षा होणे योग्य ठरेल. कारण आरोपींनी अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा केल्याचे उघड झाले होते. चंदननगर भाजी मंडई भागातील विशाखा मंडल या भाजीविक्रे त्या महिलेचे अपहरण करुन त्यांनी त्या महिलेचा खून केला होता. त्यांनी तिच्यावर बलात्कारही केला होता. विश्रांतवाडी भागातून त्यांनी एका महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी अशा प्रकारचे नृशंस गुन्हे करण्यास सरावलेले होते, असे तपासात निष्पन्न झाले होते.

फाशीची मागणी करणार- अ‍ॅड. निंबाळकर

संगणक अभियंता नयना अभिजित पुजारी (वय २८) यांचे ८ ऑक्टोबर २००९ रोजी खराडी बाह्य़वळण मार्गावरुन अपहरण करण्यात आले. त्यांच्यावर आरोपींनी बलात्कार केला. त्यांच्याकडील ऐवज लुटला. आरोपींकडून ज्या पद्धतीने हा गुन्हा करण्यात आला त्याचे स्वरुप पाहता दिल्लीतील निर्भया प्रकरणाची घटना डोळयांसमोर तरळते. हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे मी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी न्यायालयाकडे करणार आहोत, असे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी सांगितले.

नयनाच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर

खटल्याचा निकाल सोमवारी लागणार अशी अपेक्षा नयना यांच्या बहिणींना होती. नयनाची बहीण मनीषा गनबावले आणि मधुरा जाधव न्यायालयात उपस्थित होत्या. ‘नयनाच्या खून खटल्याची सुनावणी गेली सात वर्षे सुरु होती. या खटल्याच्या सुनावणीला विलंब झाला. आरोपींना दोषी धरण्यात आले, ही समाधानाची बाब आहे. आरोपींना फाशीची शिक्षा योग्य आहे’, असे मनीषा आणि मधुरा यांनी सांगितले. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर दोघींना अश्रू अनावर झाले होते.

खटल्याला विलंब का झाला ?

सुरुवातीला नयना पुजारी खून खटल्याची सुनावणी न्यायाधीश मदन जोशी यांच्या न्यायालयात झाली. न्या. देशपांडे यांच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध  दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश अनंत बदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी योगेश राऊत हा ससून रुग्णालयातून पसार झाला होता. त्या वेळी सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. राऊत पावणेदोन वर्ष पसार होता. पावणेदोन वर्षांनंतर त्याला गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर आणि संतोष जगताप यांच्या पथकाने शिर्डीत पकडले. त्यानंतर पुन्हा या खटल्याची सुनावणी न्यायाधीश साधना शिंदे यांच्या न्यायालयात सुरु झाली. त्यानंतर या खटल्याचे कामकाज विशेष न्यायालयात सुरु झाले. गेली सात वर्षे या खटल्याची सुनावणी सुरु होती.