पुणे : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल ते कात्रज बोगदा या टप्प्यात रस्ते अभियांत्रिकीच्या विविध त्रुटी असल्यानेच सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाने केला आहे. रस्त्याच्या सदोष आराखड्याबाबत आणि त्याविषयी उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, त्याबाबत कोणतेही ठोस काम झाले नसल्याचेही वाहतूकदार संघटनेने म्हटले आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या या टप्प्यात विविध उपाययोजनांसह जड वाहनांना स्वतंत्र मार्गिका गरजेची असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महामार्गावर रविवारी रात्री भरधाव ट्रकच्या धडकेने अनेक वाहनांना धडक दिली. त्यात ३५ ते ४० वाहनांचे नुकसान झाले. या अपघातामुळे रस्त्याच्या या टप्प्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना यापूर्वीही महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाने सुचविल्या होत्या. त्याबाबत महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले, की सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नवले पुलाचा परिसर धोकादायक झाला आहे. वाहतूकदार आणि वाहतूक क्षेत्रातील अभ्यासक म्हणून या भागातील रस्त्याच्या त्रुटी आम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
रस्त्यावर रस्ते अभियांत्रिकीच्या अनेक त्रुटी स्पष्ट दिसून येतात. त्या आम्ही सातत्याने दाखवीत आहोत. मात्र, केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावून उपयोग होणार नाही. त्यावर ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या भागात सर्व छोट्या-मोठ्या वळणावर सर्वसमावेशक निकषांनुसार गतिरोधक आणि रंबल उभारणे अत्यंत गरजेचे आहे. चालकांना सूचना देण्यासाठी फलकांची संख्याही वाढविण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाचे म्हणजे कात्रज बोगदा ते नवले पूल या भागात जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका निर्माण करणे अत्यावश्यक आहे. अशा चुका भविष्यात होऊ न देण्यासाठी मोटार वाहन कायद्याच्या १४८ अ या कलमानुसार रस्त्याचा आराखडा आणि रचना सदोष केली असल्यास संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.