पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील दोन कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील खासगी कार्यालयात पाठविण्यात आले आहे. या नियुक्तीला आक्षेप घेऊन ती खासगी कामासाठी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर आरोग्य विभागाने ही नियुक्ती सरकारी कामासाठीच असल्याचा दावा केला आहे.
आरोग्यमंत्री सावंत यांचे कात्रज येथे खासगी कार्यालय आहे. या कार्यालयात सफाई कामगार राजू दादू सोलंकी आणि सेवक अमोल शंकर माने यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्र्यांच्या खासगी कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणीही आरोग्य हक्क कार्यकर्ता दीपक जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…शिक्षण विभागाचे डोळे उघडले… घेतला मोठा निर्णय!
यावर सार्वजनिक आरोग्य विभागाने खुलासा करीत ही नियुक्ती सरकारी कामासाठीच असल्याचे स्पष्ट केले आहे. आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आरोग्य मंत्र्यांच्या कात्रज येथील कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष सुरू असून त्या ठिकाणी दोन विशेष कार्यकारी अधिकारी काम करीत आहेत. त्यांच्या मदतीला दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागात आतापर्यंत २० महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली असून, त्याचे नियोजन या वैद्यकीय मदत कक्षातून झाले आहे. या शिबिरांमध्ये सुमारे वीस लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. गंभीर आजार, शस्त्रक्रियेची आवश्यकता अथवा सरकारी रुग्णालयात उपचार होऊ न शकणाऱ्या रुग्णांना मदत करण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होते.
मुख्यमंत्री सहायता कक्ष, धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गतची रुग्णालये व इतर संस्थाच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळवून दिली जाते. या कक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. या कक्षात दोन विशेष कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. तिथे दररोज सुमारे दीडशे रुग्ण येतात आणि तिथे त्यांना मदत केली जाते, असेही आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
हेही वाचा…पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी राज्य सरकारचे पंतप्रधान कार्यालयाला साकडे
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष सुरू आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या १७ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार तिथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे कर्मचारी रुग्णांना मदत करण्यासाठी तिथे नियुक्त केले आहेत. – डॉ. आर. बी. पवार, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग