पुणे : अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी तरुणांचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी या आक्रमक आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. या पार्श्वभूमीवर ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’चे जनक जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी आंदोलक तरुणांना अग्निपथबद्दल चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच त्या सर्व तरुणांना समजाऊन सांगण्याची गरज असल्याचं नमूद केलं. राजेंद्र निंबोरकर यांनी पुण्यातील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
राजेंद्र निंबोरकर म्हणाले, “अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहे. देशसेवेसाठी सैन्यभूमीवर उतरणारा तरुण आता हिंसाचाराच्या घटनेत पाहून मला खूप दुःख वाटत आहे. देशाचे नुकसान करायचे असा विचार कसा करू शकतो असा प्रश्न माझ्या मनात आला आहे.”
“अग्निपथ योजनेबाबत एका रात्रीमध्ये निर्णय घेतलेला नाही. तो सैन्य दलाच्या तीनही विभागाशी चर्चा करून घेतला गेला आहे. तो कोणत्याही प्रकाराचा चुकीचा नाही. चार वर्ष सेवा केल्यावर सर्व तरुणांना साडेअकरा लाख रुपये मिळतात. पेन्शनचे पैसे कमी करण्यासाठी हे केल्याचा अपप्रचार सध्या सुरू आहे. यामध्ये कोणत्याही प्रकाराचं तथ्य नाही,” असं राजेंद्र निंबोरकर यांनी सांगितलं.
राजेंद्र निंबोरकर पुढे म्हणाले, “ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित नाही. तसेच केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला असून त्याचं मी अभिनंदन करतो. मी याबाबत कोणत्याही राजकीय पार्टीच नाव घेत नाही, पण अनेकांनी आग लागली असताना, त्यामध्ये तेल ओतण्याचे काम केले आहे.”
“आपल्या देशातील अनेक भागात आयपीएस, आयएएस अधिकारी म्हणून रुजू होतात. त्या सर्व अधिकार्यांनी किमान तीन वर्ष सैन्य दलात जायला हवं. त्यानंतर तेथील शिस्त समजेल आणि देशाबद्दल प्रेम भावना समजण्यास मदत होईल. यासाठी सक्ती केली पाहिजे,” अशी मागणी यावेळी राजेंद्र निंबोरकर यांनी केली.