पावसाळा सुरू झाल्यापासून कान-नाक व घसा तज्ज्ञांकडे येणारे जवळपास ३० ते ४० टक्के रुग्ण अॅलर्जीच्या त्रासाचे असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून दम्याच्या नवीन रुग्णांच्या संख्येतही १० ते १५ टक्क्य़ांची वाढ झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले असून वातावरणातील अॅलर्जिक घटक या दम्याचे प्रमुख कारण ठरत आहेत.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील अॅलर्जिक घटकांमध्ये वाढ होत असून सध्या बुरशीचे कण आणि वनस्पतींचे परागकण हे अॅलर्जीचे कारण ठरत असल्याची माहिती काम-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. विनया चितळे चक्रदेव यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘अॅलर्जिक घटक शरीरात शिरल्यावर त्या घटकांना जंतू समजून शरीर ‘हिस्टामिन’ हे द्रव्य तयार करते. नाकातील अॅलर्जीच्या त्रासात नाकात खाज येते, नाकातून पाणी येते, शिंकाही येतात. नाक आतल्या आवरणाला सूज आल्यावर त्याभोवती असलेल्या सायनसची तोंडे बंद होतात आणि सायनसला संसर्ग होतो. अॅलर्जीकारक घटक तोंडावाटे घशात गेल्यास घशात खवखव होते आणि घशाच्या आतले आवरण संवेदनशील होते. फुफ्फुसांच्या नळ्यांना सूज आल्यास खोकला आणि दमा होऊ शकतो. या चक्राचा पावसाळ्याशी संबंध असून या ऋतूत हे त्रास वाढलेले बघायला मिळतात. पाऊस पडायला लागल्यापासून बाह्य़रुग्ण विभागातील जवळपास ३० ते ४० टक्के रुग्ण अॅलर्जीच्या त्रासाचेच दिसून येत आहेत.’
दमा तज्ज्ञ डॉ. महावीर मोदी म्हणाले, ‘इतर औषधांनी बऱ्या न होणाऱ्या कोरडय़ा खोकल्याचे रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात वाढले असून हा खोकला अॅलर्जिक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दम्याच्या नवीन रुग्णांमध्ये नेहमीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. हे रुग्ण प्रामुख्याने लहान ते तरुण या वयोगटातील आहेत. वनस्पतींचे पगारकण आणि बुरशी हे अॅलर्जीकारक घटक या रुग्णांमध्ये दम्याचे प्रमुख कारण दिसून येत असून तापमानातील चढउतार हेही एक कारण आहे.’
अॅलर्जीचे हे त्रास सध्या अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.
– नाकाची अॅलर्जी
– नाक व कानाला जोडणारी नळी बंद झाल्यामुळे कानात दडे बसणे
– नाकाभोवतीच्या सायनसची तोंडे बंद झाल्यामुळे सायनसचा संसर्ग
– अॅलर्जिक खोकला
– घसा दुखणे
अॅलर्जीच्या त्रासाचे रुग्ण वाढले
पावसाळा सुरू झाल्यापासून कान-नाक व घसा तज्ज्ञांकडे येणारे जवळपास ३० ते ४० टक्के रुग्ण अॅलर्जीच्या त्रासाचे असल्याचे दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-08-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allergy monsoon doctor patient