पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांसह शरद पवार गटात जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं समोर आलेले आहे. परंतु, याबाबत शरद पवार हेच निर्णय घेतील, मी केवळ त्यांची भेट घडवून आणली असं मत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी व्यक्त केलं आहे.

भाजपचे दहापेक्षा अधिक नगरसेवक माझ्या संपर्कात असून त्यांची देखील शरद पवार यांच्यासोबत भेट घडवून आणणार असल्याचे कामठे यांनी म्हटले आहे. आगामी काळात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपचे अनेक माजी नगरसेवक शरद पवार गटात दिसू शकतात. तसे झाल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची डोकेदुखी वाढू शकते. सध्या शरद पवार गटाने तिन्ही विधानसभांवर दावा केला असून जिंकण्याचा चंग शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी बांधला आहे.

हेही वाचा – इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील २९ बंगल्यांवर हातोडा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणांचा पिंपरी महापालिकेला आदेश

हेही वाचा – पूर्व घाटात आढळला अनोखा बेडूक….काय आहे वेगळेपण?

तुषार कामठे म्हणाले, अजित गव्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय दृष्टिकोनातून भेट घेतली. अजित गव्हाणे यांच्यासोबत १४ नगरसेवक आले होते. शरद पवार आणि त्यांच्यात राजकीय सकारात्मक चर्चा झालेली आहे. सर्व अधिकार शरद पवार यांना आहेत. काही दिवसांमध्ये ते योग्य तो आणि सकारात्मक निर्णय घेतील. पुढे ते म्हणाले, तिन्ही विधानसभेवर आमचा हक्क आहे. आम्ही त्या लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. तीन विधानसभा जिंकण्यासाठी आम्ही ताकद लावणार आहोत. पुढे ते म्हणाले, अजित पवार गटातीलच नव्हे तर भाजपचे माजी नगरसेवकदेखील आमच्या संपर्कात आहेत. ते शरद पवार यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहेत. शहराध्यक्ष या नात्याने पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाला पक्षाचे दरवाजे खुले आहेत. त्यांना कुठं पद, कुठल्या निवडणुका लढवायच्या हा निर्णय पक्षश्रेष्ठी म्हणून शरद पवार, जयंत पाटील आणि रोहित पवार घेतील. अजित गव्हाणे यांच्याबद्दलचा निर्णयदेखील शरद पवार लवकरच घेतील. पुढे ते म्हणाले, भाजपचे दहा नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. त्यांची लवकरच शरद पवार यांच्यासोबत भेट घडवून आणणार आहे. काही जणांच्या भेटी झालेल्या आहेत, असेही कामठे यांनी स्पष्ट केले आहे.