पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात जेमतेम ३२ टक्के साठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तर परिस्थिती अवघड होईल, त्यामुळे १५ एप्रिलनंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल, असे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी चिंचवड येथे बोलताना केले. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन भामा आसखेड तसेच आंदरा धरणातील पाणी मंजूर करून घेतले आहे. त्यापैकी एकाची निविदा तातडीने मंजूर करण्याचे आदेश त्यांनी या वेळी दिले.
पिंपरी पालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ अजितदादांच्या हस्ते झाला. दळवीनगर येथील शाळा इमारतीच्या भूमिपूजनानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त राजीव जाधव, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, शिक्षण मंडळाचे सभापती चेतन भुजबळ, उपसभापती नाना शिवले, स्थानिक नगरसेवक शमीम पठाण, गणेश लोंढे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले,‘‘पाण्याचे संकट मोठे आहे. लातूरला महिन्यातून एकदा पाणी मिळते. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लातूरला पाणी पुरवण्यासाठी दोन खास रेल्वे दिल्या आहेत. आमच्या वेळी अकोल्यातही अशीच परिस्थिती उद्भवली होती. पाण्यासाठी अशी वाईट वेळ येऊ नये. पिंपरी-चिंचवड वेगाने वाढते आहे, पिंपरीतही पाण्याचे नियोजन करावे लागेल. नागरिकांनी पाण्याची काटकसर करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. पाणी कमी आहे म्हणून अनेक ठिकाणी बांधकामे बंद ठेवण्यात येत आहेत. अजून तरी तशी वेळ आपल्यावर आली नाही.’’ प्रास्ताविक शमीम पठाण यांनी केले. रमेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले.