सिंहगड रस्त्याला पर्यायी म्हणून आखण्यात आलेल्या वडगाव बुद्रुकपर्यंतच्या रस्त्याला चार कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी एकमताने मंजूर करण्यात आला. कालव्याच्या काठाने हा रस्ता तयार केला जाणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यान ते वडगाव बुद्रुक दरम्यान कालव्याच्या काठाने हा रस्ता आखण्यात आला आहे. रस्त्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे वर्गीकरणाच्या माध्यमातून या रस्त्याला निधी द्यावा, असा प्रस्ताव सिंहगड रस्ता भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीला दिला होता. मात्र तो सातत्याने पुढे ढकलला जात होता. स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. स्थायी समिती सदस्यांनी या रस्त्याच्या जागेची पाहणी देखील गेल्या आठवडय़ात केली होती.
पहिल्या टप्प्यात वडगाव ते विश्रांतीनगर हा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात विश्रांतीनगर ते पु. ल. देशपांडे उद्यान या दुसऱ्या टप्प्याचे व त्यानंतर पु. ल. देशपांडे उद्यान ते मित्रमंडळ या तिसऱ्या टप्प्याचे काम केले जाईल. विश्रांतीनगरच्या पुढचा टप्पा हा सार्वजनिक खासगी सहभागातून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप- पीपीपी) तयार केला जाईल. या रस्त्याचा मूळचा प्रस्ताव वडगाव ते पु. ल. देशपांडे उद्यान असा होता. ही लांबी साडेचार किलोमीटर एवढी होती. हा प्रस्ताव मंजूर करत असताना हा रस्ता पुढे पु. ल. देशपांडे उद्यान ते मित्रमंडळ दरम्यान करावा, अशी उपसूचना श्रीकांत जगताप आणि राहुल तुपेरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी दिली व ती मंजूर करण्यात आली, असे स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी सांगितले. या रस्त्याची लांबी साडेसहा किलोमीटर असून रुंदी सरासरी बारा मीटर इतकी असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा