पुणे : सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता असलेला आणि निधीअभावी रखडलेल्या उजवा मुठा कालवा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रखडलेल्या रस्त्याची एक बाजू पूर्ण होत आली असून दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण झाले आहे. येत्या महिन्याभरात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे कित्येक वर्षांनंतर सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
अनावश्यक कामांवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेला अवघा तीन कोटींचा निधी उपलब्ध करून देता न आल्याने सिंहगड रस्त्याला पर्यायी ठरणारा हा रस्ता गेल्या वर्षभरापासून रखडला असल्याची वस्तुस्थिती पुढे आली होती. पर्यायी रस्ता नसतानाच राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. सिंहगड रस्त्याला पाच पर्यायी रस्ते असले तरी ते कागदावरच राहिल्याची वस्तुस्थिती आहे.
सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महापालिकेने मुठा नवीन उजवा कालव्याच्या बाजूने फनटाईम चित्रपटगृह ते पु. ल. देशपांडे उद्यान पर्यायी रस्ता करण्याचे प्रस्तावित केले. त्यातील फनटाईम चित्रपटगृह ते हिंगणे या दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी चौकातून येणाऱ्या सर्व वाहनांकडून या रस्त्याचा वापर सध्या सुरू आहे. हिंगणे ते पु.ल. देशपांडे उद्यान या दरम्यानच्या रस्त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले असून शेवटच्या टप्प्यात पाचशे मीटर लांबीचे काम रखडले आहे. हे काम पूर्ण करून या रस्त्याची रुंदी साडेसात मीटर करण्यासाठी तीन कोटींचा निधी आवश्यक आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून हा निधी पथ विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्याचा वापर करता येत नव्हता.
एका बाजूला महापालिकेकडून अनावश्यक कामांवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. अनावश्यक कामे आणि खरेदीवरील उधळपट्टी थांबवावी आणि कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यासाठी तरतूद करावी आणि कामे पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. मात्र त्यानंतरही महापालिकेच्या पथ आणि प्रकल्प विभागाला पर्यायी रस्त्याच्या कामाला प्राधान्य देता न आल्याने त्याबाबत महापालिकेवर टीका करण्यात आली होती. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ते निर्माण करून या भागातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तब्बल ५४ कोटींची तरतूद महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकात केली आहे. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. डोणजे, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेडसिटी, धायरी, वडगांव, सनसिटी, माणिकबाग येथे जाण्यासाठी सिंहगड रस्ता एकमेव रस्ता आहे.
पर्यायी रस्त्यांसाठीच्या तरतूदी
’ सिंहगड रस्ता उड्डाणपूल- ४० कोटी
’ लगड वस्ती ते सावित्री गार्डन- ५५ लाख
’ राजयोग सोसायटी ते लगड वस्ती- ५० लाख
’ इंडियन ह्यूम पाइप ते सर्वेक्षण क्रमांक ३२- १ कोटी
’ धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती रस्ता – ५५ लाख
रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून हा रस्ता विकसित करण्यात आला आहे. – व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alternative route sinhagad road towards completion open road traffic throughout month amy