पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा वाढता ताण कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून हडपसर टर्मिनलच्या विकासावर भर देण्यात आला आहे. या टर्मिनलसाठी एकूण १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावरून सुटणार आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाला उपनगरी परिसरात पर्यायी स्थानक निर्माण होणार आहे.
सध्या हडपसर टर्मिनलवरील फलाट क्रमांक १, २ आणि ३ ची लांबी वाढविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याचबरोबर ११ कोटी ६९ लाख रुपयांच्या प्रवासी सुविधा उभारण्यात येत आहेत. यात सर्वसाधारण प्रतीक्षागृह, लाऊंज, ५ तिकीट आरक्षण केंद्रे, चौकशी केंद्रे, फलाटांवर ८०० मीटर लांबीचे शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्था, प्रवाशांसाठी तीन विश्रांतीकक्ष, तिकीट तपासणीस कार्यालय आणि प्रसाधनगृह, सामान कार्यालय, पार्सल कार्यालय, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांसाठी कार्यालय, वीज उपकेंद्र इमारत, वाहनतळ, रस्त्यांचे रुंदीकरण ही कामे वेगाने सुरू आहेत. याचबरोबर सध्या असलेले कर्मचारी निवास पाडून त्याजागी स्थानक इमारत उभी राहत आहे.
आणखी वाचा-प्रवांशासाठी खूशखबर! पुणे रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण सुरू
ही कामे होणार…
हडपसर टर्मिनलवर फलाटांची लांबी ६०० मीटरपर्यंत वाढविली जाणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या स्थानकावर थांबणे आणि सुटणे शक्य होणार आहे. सध्याची मालवाहतुकीच्या गाड्यांच्या मार्गाचे प्रवासी गाड्यांच्या मार्गात रुपांतर केले जाणार आहे. याचबरोबर स्थानकाची नवीन इमारत बांधली जाणार आहे. स्थानकाच्या आवारातील इतर सुविधांची उभारणी केली जाणार आहे. नवीन वाहनतळ आणि पाणी पुरवठ्यासाठी टाक्यांची उभारणी केली जाणार आहे.
सध्या पुणे स्थानकावर नवीन गाड्या सुरू करण्यास मर्यादा आहेत. हडपसर रेल्वे टर्मिनल सुरू झाल्यानंतर तिथून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होतील. प्रवाशांसाठी अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याचा यामागे हेतू आहे. -डॉ.रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे