महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवून बालगंधर्व रंगमंदिराचे माजी व्यवस्थापक अमर परदेशी यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी परदेशी यांच्या निलंबनाचा आदेश नुकताच बजावला आहे.
अमर परदेशी हे सध्या औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये सेवेत आहेत. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश निघाले आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथील कॅफेटेरियाचे मासिक भाडे आणि वाहनतळाचे आगाऊ भाडे या रकमेचा महापालिका कोषामध्ये भरणा न झाल्याचे निदर्शनास आले आहे.
औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली होण्यापूर्वी अमर परदेशी बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. स्थायी समितीच्या ठरावानुसार रंगमंदिर आवारात कॅफेटेरिया चालविणाऱ्याकडून जून २०११ ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत दरमहा १ लाख २९ हजार ९९८ रुपये याप्रमाणे २० लाख ७९ हजार ९६८ रुपये भाडे भरणे अपेक्षित होते. मात्र, दरमहा ६४ हजार ३३० रुपये या जुन्या दराप्रमाणेच ८ लाख ३६ हजार २९० रुपये भाडे भरण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाहनतळाच्या ठेकेदाराकडून दरमहा ४५ हजार ४५५ रुपये याप्रमाणे ११ महिन्यांचे ४ लाख ४३ हजार ९४० रुपये एवढे आगाऊ भाडे भरून घेणे आवश्यक होते, मात्र महापालिका कोष विभागामध्ये एक रुपयाचादेखील भरणा झाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेचे १६ लाख ८७ हजार ६१७ रुपयांचे उत्पन्न थकीत राहिल्याच्या कालावधीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले अमर परदेशी हे जबाबदार असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अमर परदेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, तीन महिन्यांत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा