देशभरातील १०० हून अधिक आजारी कंपन्यांसाठी केंद्र सरकार लवकरच विशेष धोरण ठरवणार असून त्या दृष्टीने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे, ते यासंदर्भात सकारात्मक आहेत, अशी माहिती भाजपचे खासदार अमर साबळे यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली. ओवेसी यांचा पक्ष या मातीशी इमान राखणारा नसून पावसाळी छत्र्यांप्रमाणे आहे, देशातील राजकीय परिस्थितीवर त्याचा काहीही फरक पडणार नाही, अशी टिपणीही त्यांनी केली.
पिंपरीतील एचए कंपनीसाठी केंद्रीय पातळीवर केलेल्या प्रयत्नांची तसेच खासदार झाल्यानंतर महिनाभरातील राज्यभराच्या दौऱ्याची माहिती साबळेंनी दिली. शहराध्यक्ष सदाशिव खाडे, वसंत वाणी, एकनाथ पवार, महेश कुलकर्णी उपस्थित होते. साबळे म्हणाले, देशातील आजारी कंपन्यांना सध्याच्या स्थितीतून बाहेर आणून पूर्ववैभव मिळवून देणे, त्या सुस्थितीत चालवण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पिंपरीतील एचए कंपनीसह देशातील १०० हून अधिक कंपन्यांसाठी केंद्राचे लवकरच धोरण ठरणार आहे. त्या दृष्टीने आपल्यासह अनेक खासदारांनी जेटली यांच्याशी चर्चा केली आहे. या कामी अर्थमंत्री सकारात्मक असून वकरच याबाबतचे धोरण ठरेल. पूर्वी काँग्रेसने केले, तेच मतांचे व भावनांचे राजकारण ओवेसी करत आहेत. रझाकारांनी सर्वसामान्य जनतेवर केलेले अत्याचार सर्वज्ञात आहेत. त्यांची संस्कृती भारतीय नाही. ‘एमआयएम’ या मातीशी इमान राखणारा पक्ष नाही. मुस्लीम व दलितांना एकत्र आणण्याचा ते आभास निर्माण करत आहेत. पावसाळ्यातील छत्र्या उगवतात व नष्टही होतात, तशीच अवस्था ओवेंसीच्या पक्षाची आहे, असे ते म्हणाले. रेडझोनची मर्यादा कमी करण्याच्या मागणीसाठी संरक्षणमंत्र्यांसमवेत आगामी अधिवेशनात चर्चा करणार आहे. केंद्राच्या निधीद्वारे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी पालिकेच्या प्रकल्पांमधील गैरव्यवहारांची चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबवडे गाव दत्तक; संग्रहालयासाठी ५० लाख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेले रत्नागिरीतील आंबवडे गाव खासदार म्हणून दत्तक घेणार असल्याचे अमर साबळे यांनी सांगितले. याशिवाय, बाबासाहेबांच्या विविध वस्तूंचे जतन करणाऱ्या संग्रहालयाला खासदार निधीतून ५० लाखांची देणगी देण्याची घोषणाही साबळे यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा