भाजपकडे असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी अमर साबळे यांना जाहीर केली असताना, ऐनवेळी ती जागा रिपाइंला सोडण्यात आली असल्याने  सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे उडालेल्या गोंधळात दोन्हीकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले. मुंडे-गडकरी गटातील शह-काटशहाच्या राजकारणातून झालेल्या या फेरबदलानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचे इशारे दिले आहेत.
गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय अमर साबळे यांनी गेल्यावेळी िपपरीतून निवडणूक लढवली होती. तथापि, थोडय़ा फरकाने ते राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांच्याकडून  पराभूत झाले. साबळेंना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाच्या निवड समितीने घेतला. त्यानुसार, ते अर्ज भरण्यासाठी निघाले होते. तथापि, त्यांना कालपासून एबी फॉर्म देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. आज दुपारी चिंचवडसाठी लक्ष्मण जगताप व भोसरीसाठी एकनाथ पवार यांचे एबी फॉर्म देण्यात आले. तथापि, साबळेंना तो देण्यात आला नाही. तेव्हाच कार्यकर्त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. बरीच चालढकल केल्यानंतर हा मतदारसंघ रिपाइंला सोडण्यात आल्याचे पक्षश्रेष्ठींनी कळवले आणि भाजपचे पदाधिकारी बुचकळ्यात पडले, तेथे बराच गोंधळही झाला. या परिस्थितीत साबळे आणि सोनकांबळे या दोघांनीही अर्ज दाखल केले. भाजपने सहकार्य करावे, असे आवाहन सोनकांबळे यांनी केले. भाजप पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन मतदारसंघ सोडल्याचा निषेध केला आणि हा निर्णय मागे न घेतल्यास राजीनामे देऊ, असा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला. हा निर्णय घेताना स्थानिक नेत्यांना अंधारात ठेवले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा