केंद्रात व राज्यात सत्ता आल्यानंतर पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांनाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. अॅड. सचिन पटवर्धन यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा, अनुप मोरे यांना शासकीय समिती मिळाल्यानंतर अमर साबळे यांना थेट खासदारकीची ‘लॉटरी’ लागली. त्यामुळे उत्साह दुणावलेल्या शहर भाजपने शक्तिप्रदर्शन करत पिंपरी पालिकेत सत्ता आणण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. गटबाजी संपवा तरच सत्ता मिळेल, असे सूचक आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी मेळाव्यात केले. तर, एचए कामगारांच्या प्रश्नाचा पाठपुरावा हे खासदार म्हणून पहिले काम असेल, अशी ग्वाही साबळेंनी याच कार्यक्रमात दिली.
राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने साबळेंचा आमदार जगतापांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अॅड. पटवर्धन, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, वसंत वाणी, अशोक सोनवणे आदींसह मोठय़ा संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. जगताप म्हणाले,‘‘ केंद्रात व राज्यात सत्ता मिळाल्यानंतर आता पिंपरी पालिका ताब्यात घेऊ. मात्र त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. वातावरण चांगले आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद दूर केले पाहिजेत. सक्षम उमेदवारास तिकीट मिळावे. तितके सक्षम नसणाऱ्यांना शासकीय पदे दिली जावीत. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी २० टक्के जागा निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी, त्यातील निम्म्या जागा जरी निवडून आणल्या तरी बहुमताचा आकडा गाठू. साबळे म्हणाले, अर्धा कप चहा कुणाला पाजला नाही, कुठे अर्ज केला नाही की परिचयपत्रक दिले नाही. न मागताही आपल्याला खासदारकी मिळाली. आपली अनामत रक्कमही पक्षाच्या आमदारांनी भरली. टपरीवर चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. पोस्टर लावणारा मंत्रीपदावर जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, मागासवर्गीय समाजातील एक कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, हे केवळ भाजपमध्ये घडू शकते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू दुर्गे यांनी केले. माऊली थोरात यांनी आभार मानले.

Story img Loader