पुणे : गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर बनावट बियाणे राज्यात येत आहेत. राज्य सरकार, कृषी विभागाचे अधिकारी आणि खासगी कंपन्यांच्या संगनमतांमुळे हा प्रकार सुरू असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
दानवे यांनी गुरुवारी (२० जून) पुण्यात सहकार आणि कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. खरीप हंगामासाठी अपेक्षित कर्जपुरवठा होत नसून, राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्ट्यांपैकी केवळ २० टक्केच कर्जपुरवठा केला आहे. याकडे लक्ष वेधून त्यांनी सहकार विभागाला धारेवर धरले.
हेही वाचा…केंद्रीय मंत्री मोहोळांच्या समोरच भाजपाच्या दोन गटात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
दानवे म्हणाले, गुजरातमधून प्रामुख्याने कापसाचे बनावट बियाणे मोठ्या प्रमाणावर राज्यात येत आहेत. राज्य सरकार, कृषी विभागाचे अधिकारी आणि खासगी कंपन्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे. त्या बनावट बियाणांची पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम वाया जात आहे. हंगाम वाया गेल्यामुळे अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. विदर्भात पुन्हा आत्महत्या वाढू लागल्या आहेत. मात्र, राज्य सरकारला याचे सोयरसुतक नाही..
हेही वाचा…पुणे: वाद मिटवण्यासाठी बोलवून तरुणीला मारहाण; तीन मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
राज्यात खतांचे लिंकिंग सुरू आहे. युरिया खतासाठी मिश्र किंवा संयुक्त खत घ्यावे लागते. शून्य उपयोग असलेली जैविक खते घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती केली जात आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ जाणीवपूर्वक निष्कृष्ट दर्जाचे बियाणे, यंत्रे, औषधे, जैविक खते शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. राज्यातील सोयाबीन उत्पादक पट्ट्यात डीएपी खताचा तुटवडा आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येऊ घातले आहे. पण, कृषी विभागाला त्याचे काही देणेघेणे नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीकाही दानवे यांनी केली.