पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) सर्वोत्कृष्ट साखर कारखान्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. अहिल्यानगर येथील ‘अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड’ सर्वोत्कृष्ट साखर कारखाना ठरला असून, विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला देण्यात येणार आहे.

व्हीएसआयच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी (२३ जानेवारी) पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्याबाबतची माहिती व्हीएसआयचे उपाध्यक्ष, विश्वस्त दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळ सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> आळंदी : योगी निरंजन नाथ यांची संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्त पदी निवड

सभेमध्ये सभासद कारखान्यांना आणि विभागवार जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस भूषण, राज्यस्तरीय ऊस भूषण, साखर कारखान्यातील आणि संस्थेमधील अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, साखर कारखान्यांना विभागवार तांत्रिक कार्यक्षमता, ऊस विकास आणि संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट आसवनी, सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन, नावीन्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजक कारखाना यांना विविध पुरस्कार दिले जातील, प्रशस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पिंपरी महापालिकेचे ‘व्हीजन @५०’ ; भविष्यातील समस्या आणि उपाययोजनांवर सहा आठवडे गटचर्चा

सन २०२३-२४ वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट ऊस उत्पादन घेतल्याबद्दल एकूण सहा शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण १३ सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांना वैयक्तिक सात बक्षिसे तसेच संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना पाच वैयक्तिक बक्षिसे यावेळी देण्यात येतील, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार अहिल्यानगर येथील अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड, अंबिकारनगर यांना जाहीर झाला आहे. दोन लाख ५१ हजार रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला देण्यात येणार आहे. एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अन्य पुरस्कार

सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार : दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड (आलेगाव, ता. दौंड, जि. पुणे )

– सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार : सोमेश्वर साखर कारखाना (सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे ) – सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना (कागल, जि. कोल्हापूर)

Story img Loader