पुणे : विद्यार्थी वसतिगृहात राहून घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चोरट्याने आंबेगाव, बावधन, लोणीकंद परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.व्यंकटेश रमेश (वय २२ वर्षे, रा. पी.जी. बिल्डिंग, एमआयटी महाविद्यालयाजवळ, कोथरूड, मूळ रा. बंगळुरू, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गेल्या महिन्यात १७ मार्च रोजी कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात भरदिवसा एका सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले. चित्रीकरणावरुन तपास करुन पोलिसांनी रमेश याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आंबेगाव, लोणीकंद आणि बनावधन भागात घरफोडी केल्याची कबुली दिली.आरोपी व्यंकटेश रमेश मूळचा बंगळुरूतील आहे. तो कोथरूड भागातील एका खासगी वसतिगृहात (पीजी) राहत होता. वसतिगृहात राहून तो घरफोडीचे गुन्हे करत होता. त्याने आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, उपनिरीक्षक माेहन कळमकर, पोलीस कर्मचारी शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे यांनी ही कामगिरी केली.
घरफोडी प्रकरणात चोरटा गजाआड
भरदिवसा घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला गु्न्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. त्याच्याकडून एक लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. मॉण्टी ऊर्फ आर्यन माने (वय २२ वर्षे, रा. वंदे मातरम चौक, रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. हडपसर परिसरात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाचा समांतर गुन्हे शाखेकडून केला जात होता माने यानेघरफोडी केल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करुन त्याला अटक करण्यात आली.