नारायणगाव: आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयासमवेत असून तालुक्यातील जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे झालेल्या मेळाव्यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांचे विशासू सहकारी आणि शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.
राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मंगळवारी मंचर येथील पक्ष कार्यालयात झाली. माजी सभापती संजय गवारी, तालुका युवक अध्यक्ष अंकित जाधव, बाजार समिती संचालक नीलेश थोरात, संतोष गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. मंचर बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, उपसभापती सचिन पानसरे, महिला अध्यक्ष सुषमा शिंदे, माऊली आप्पा घोडेकर, सुभाष मोरमारे, प्रकाशराव घोलप या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-“अजितदादांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट नाही”, भाजपचे सचिव आमदार श्रीकांत भारतीय यांचे मोठे विधान
शहा म्हणाले की, आंबेगाव तालुक्याची ओळख दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे आहे. तालुक्यातील जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. वळसे पाटील यांनी घेतलेला निर्णय तालुक्यातील जनतेला मान्य आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले की , आंबेगाव तालक्यातील जनता वळसे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तालुक्यातील काही प्रलंबित प्रश्न आणि रखडलेली विकास कामे मार्गी लागण्यासाठी वळसे पाटील यांच्या मंत्रिपदाचा उपयोग होणार आहे. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन भोर यांनी प्रास्ताविक केले. भगवानराव वाघ यांनी आभार मानले.