पुण्यातील अंबिल ओढा येथील वसाहतीमधील घरांवर मागील आठवड्यात महापालिकेडून कारवाई करण्यात आली. तेथील घटनास्थळाला आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, महापालिका प्रशासनावर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. एवढच नाही तर पुण्याच्या महापालिकेला, महपौर व पदाधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असं देखील नितीन राऊत म्हणाले. याचबरोबर, हा दलित समाजावरील अन्याय आहे, या अन्याायविरोधात आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावा ही मागणी निश्चितपणे आम्ही सरकारकडे नोंदवणार. असल्याचंही ऊर्जामंत्री राऊत यांनी बोलून दाखवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यमांशी बोलाताना नितीन राऊत म्हणाले, “पुण्यातील आंबिल ओढा परिसरात परवा भर पावसात ज्या पद्धतीने राक्षसी वृत्तीने, दंडेलशाहीने, या ठिकाणी या गरिबांची घरं तोडण्यात आली, उध्वस्त करण्यात आली. त्यांच्या घरातील सामान फेकण्यात आलं. एवढच नव्हे तर महिलांना हात लावून, त्यांचे केस ओढण्यात आले. हा जो सर्व प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. तो अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य असा आहे. पहिली गोष्ट म्हणजे पावसाळी दिवस आहे. तुम्हाला कायदेशीर अधिकार प्राप्त असले, तरी या कालावधीत तुम्हाला कुणाच्या घराला हात लावता येत नाही, घरं तोडता येत नाही. संपूर्ण देशात करोना महामारी सुरू आहे आणि करोनाच्या दृष्टीने कायद्यात म्हटलेलं आहे की सर्वांनी या ठिकाणी मास्क लावावा, सोशल डिस्टंस ठेवावा, हात धुवावे मग एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी येऊन प्रशासनाने ही जी कारवाई केली. पुणे महापालिकेला लाज वाटली पाहिजे, खऱ्या अर्थाने तिथल्या महापौर, पदाधिकाऱ्यांना की त्यांनी हे थांबवलं नाही. त्यांच्या अधिकारानुसार ते थांबवू शकले असते. माझ्या जर नागपूरमध्ये हे घडलं असतं, तर मी त्या रोडरोलरच्या समोर लोळून हे थांबवलं असतं. परंतु एकानेही हे काम केलं नाही. या घटनेचा निषेधच या ठिकाणी केला पाहिजे.”

आंबिल ओढा कारवाई : गृहमंत्री तटस्थ राहतील याविषयी शंका – प्रकाश आंबेडकर

तसेच, “मी या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यावर, मला रहावलं नाही. मला वाटलं माझ्या कुटुंबांवर हा अन्याय मी सरकारमध्ये होताना जर होतोय, तर मी कसा स्वस्थ बसू? मी या ठिकाणी परिस्थिती पाहिली, इथे काही महिलांच्या हातावर व्रण दिसून आले. हा निश्चतच आमच्या दलित स्त्रियांचा अपमान करण्यात आला आहे. दलितांवर मोठा अन्याय करण्यात आलेला आहे. या अन्याायविरोधात आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावा, ही मागणी निश्चितपणे आम्ही सरकारकडे नोंदवणार.” असं देखील राऊत यांनी यावेळी सांगितलं.

अंबिल ओढा कारवाई : पुरावा द्या, मी पोलिसांत तक्रार करेन; सुप्रिया सुळेंची ग्वाही

तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. असा प्रश्न विचारताच राऊत यांनी उत्तर देणे टाळत, कारवाई दरम्यान महापौर काय झोपा काढत होते का? ते का पुढे आले नाही. त्यांनी का बुलडोझर थांबविला नाही. महापालिकेत सत्ता कोणाची आहे. असा सवाल उपस्थित करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर त्यांनी टीका केली.

तुम्ही सरकारमध्ये आहात, कशा प्रकारे निःपक्ष चौकशी केला जाणार, या प्रश्नावर म्हणाले की, मी देखील एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. माझ्याकडे देखील महापालिका आहे. त्याला स्वायत्तता अधिकार असून ही कारवाई पालकमंत्र्यांनी केली की, अमुक माणसाने केली. त्याबद्दल आमच्याकडे दाखल नाहीच ना, चौकशीतून सर्व बाहेर येईल आणि मी कोणालाही वाचू इच्छित नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या कारवाई दरम्यान महिलांना ज्यांनी हात लावला. अशा कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambil odha action pune mayor office bearers should be ashamed nitin raut got angry msr 87 svk