पुण्यातील आंबिल ओढा परिसरात असलेल्या स्थानिकांच्या घरावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच घरं पाडण्यात आली. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाडापाडी थांबण्यात आली. मात्र, या कारवाईचे पडसाद आज उमटले. घरं पाडण्यात आलेल्या स्थानिकांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सुळे यांनी माहिती घेतली. यावेळी आंदोलकांनी कारवाई का करण्यात आली, पुन्हा घरं बांधून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर घरं पाडल्याबद्दल अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी केली.
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरांवर महापालिकेनं गुरुवारी हातोडा चालवला होता. गुरुवारी पहाटे महापालिकेनं पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. या कारवाई दरम्यान नागरीक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष होऊन तणाव निर्माण झाला होता. प्रचंड गोंधळानंतरही महापालिकेनं कारवाई सुरूच ठेवली होती. सुरुवातीला कारवाईच्या आदेशाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. बिल्डरनेच कारवाई केल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. मात्र, नंतर महापालिकेनं कारवाईची जबाबदारी घेत स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली असून, पाडण्यात आलेल्या घरांवरून स्थानिक आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा- आंबिल ओढा कारवाई : “पाऊस सुरूये, करोना आहे; आम्ही मरायचं का?”
स्थानिकांनी सोमवारी सकाळी पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केलं. यावेळी मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनस्थळी जाऊन सुप्रिया सुळे आंदोलकांकडून कारवाईबद्दल आणि कारवाई करताना झालेल्या घडामोडींची माहिती घेतली. घरं पाडण्यात आलेल्या महिलांचं म्हणणंही त्यांनी ऐकून घेतलं. सुप्रिया सुळे घरं पाडण्यात आलेल्या पीडितांशी चर्चा करत असताना आंदोलकांकडून जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येत होती. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याविरोधातही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. इतकंच नाही, तर त्यांच्या पालकमंत्री पदाच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
हेही वाचा- आंबिल ओढा कारवाई : पाडापाडीला स्थगिती! स्थानिकांना न्यायालयाकडून मोठा दिलासा
आंबिल ओढा कारवाई : घरं पाडण्यात आलेल्या स्थानिकांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली.https://t.co/kCpocotQvM< सविस्तर वृत्त#Pune #AmbilOdha @supriya_sule @NCPspeaks pic.twitter.com/dRXkHvUOwK
— LoksattaLive (@LoksattaLive) June 28, 2021
पाऊस सुरू झाल्यानंतर आणि करोनाचं संकट असताना महापालिकेनं कारवाई का केली?, अशी विचारणा आंदोलकांनी केली. त्याचबरोबर पाडण्यात आलेली घरं बांधून देण्यात यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी घोषणा दिल्या. यावेळी प्रताप निकम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत आंदोलकांनी गंभीर आरोप केला. “महापालिकेच्या आयुक्तांसमोर निकमने ‘मी अजित पवार यांचा माणूस आहे. मला कुणीच काही करू शकत नाही’ असा इशारा दिला, असंही आंदोलक सुप्रिया सुळेंशी बोलताना म्हणाले.