पुणे : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला असून, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या ‘बीव्हीजी’ आणि ‘सुमित’ या कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने निविदा देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी सोमवारी येथे केला. निवडणूक निधीसाठी या दोन कंपन्यांना पायघड्या घालण्यात आल्याने सावंत यांच्या या घोटाळ्याची राज्य शासनाने सखोल चौकशी करावी आणि सावंत यांनी आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही पवार यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात दूध आणि शालेय पोषण आहारातील गैरव्यवहार पुढे आणला होता. त्यानंतर सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्य विभागातील रुग्णवाहिका घोटाळ्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आरोग्यमंत्री सावंत हे हाफकिन संस्था ओळखण्यात चूक करतात. मात्र पैसे खाण्यात गल्लत करत नाहीत. नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या कामातून जमा झालेला कोट्यवधींचा निधी निवडणुकीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

राज्यातील अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमध्ये एका स्पॅनिश कंपनीबरोबर करार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील सुमित या कंपनीने त्यांना निविदा करून दिली होती. या कंपनीला स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. मात्र सुमित कंपनी निविदेमध्ये भागधारक झाली. त्यांना रुग्णवाहिका पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. सुमित कंपनीला काम मिळाल्यानंतर बीव्हीजी कंपनीकडून त्याबाबत तक्रार करण्यात आली. त्यामुळे बीव्हीजी कंपनीचाही निविदेमध्ये समावेश करण्यात आला. त्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी दबाव टाकला. बीव्हीजी कंपनीला अनेक ठिकाणी काळ्या यादीत टाकण्यात आले असतानाही त्यांना काम देण्यात आले. या रुग्णवाहिकेसाठी दोनवेळा निविदा काढण्यात आली. बाजारदरापेक्षा दुप्पट दराने रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये तसा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”

राज्यातील शासकीय रुग्णालयात सुविधांअभावी बालकांचे मृत्यू होण्याचे प्रकार काही महिन्यांपूर्वी घडले होते. मात्र, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्याऐवजी राज्य सरकारने साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा केला आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंदाजपत्रकापेक्षा हा मोठा घोटाळा आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

हेही वाचा – रद्द केलेल्या तिकिटाची वाढीव दराने विक्री प्रकरणी विमान कंपनीला दणका, भरपाईपोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश

पाच दिवसांची मुदत

या सर्व प्रकारात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. हा पैसा निवडणूक निधी म्हणून वापरला जाणार आहे. या घोटाळ्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे मंत्री सावंत यांनी पाच दिवसांत बाजू मांडावी. राज्य सरकारनेही या प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि सावंत यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambulance scam worth six and a half thousand crores in health department rohit pawar allegation of awarding tenders in an illegal manner pune print news apk 13 ssb