नसीरुद्दीन शाह म्हणतात देशातलं वातावरण पाहून मला मुलांची चिंता वाटते. मागे एका कार्यक्रमात आमिर खान म्हटला होता की त्याच्या पत्नीला हा देश असुरक्षित वाटतो. या दोघांनी खुशाल देश सोडून निघून जावं असा सल्ला विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांन दिला आहे. पुण्यात भाजपा संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद यांच्यातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हिंदी कवितांवर आधारीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात शंकर अभ्यंकर यांनी हे मत मांडलं.
याच कार्यक्रमात शंकर अभ्यंकर यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्काने गौरवण्यात आले. नसीरुद्दीन शाह यांनी देशाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. देशात माणसाच्या मृत्यूपेक्षा गायीच्या मृत्यूला जास्त महत्त्व आहे असे त्यांनी म्हटले त्यावरून वाद सुरु असतानाच आता शंकर अभ्यंकर यांनी नसीरुद्दीन शाह आणि आमिर खान या दोघांनाही देश सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांना हा देश असुरक्षित वाटत असेल त्यांनी या देशाचा इतिहास तपासावा. देशाच्या राष्ट्रपतीपदावरही मुस्लिम व्यक्ती होते हे विसरु नये असेही शंकर अभ्यंकर यांनी सुनावले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याही आठवणींवर भाष्य केलं. अनेक वर्षे राजकारणापासून दूर राहूनही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षात ठेवले गेले. ही बाब महत्त्वाची आहे असेही अभ्यंकर यांनी म्हटले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारण करताना कायमच सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवले. सत्तेच्या उच्च पातळीवर असताना ही निरागस जाणीव ठेवणारे असे ते राजकारणी होते असे मत गिरीश बापट यांनी व्यक्त केले.