पिंपरी– चिंचवड: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणावरून शरद पवार गटाचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आमदार अमित गोरखे यांच्यावर भूमिका बदलण्याचा आरोप केला आहे.

‘एक्स’ वर जयंत पाटील यांनी ट्विट करत अमित गोरखे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित गोरखे म्हणाले, जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. कोण भूमिका बदलणार आहे. हे थोड्याच दिवसात कळेल. पुढे ते म्हणाले, जयंत पाटील हे भूमिका बदलणार असल्याच्या बातम्या माझ्या वाचनात येत आहेत. भिसे कुटुंबाच्या प्रकरणात माझी भूमिका बदललेली नाही. उलट हे प्रकरण सर्वांसमोर मीच आणल आहे.

जोपर्यंत भिसे कुटुंबाला आणि ‘त्या’ मातेला न्याय मिळत नाही. तोपर्यंत मी लढत राहील, माझ्या भूमिकेवर ठाम राहील. चूक करणाऱ्या डॉ. घैसास आणि त्यांच्या टीमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी आग्रही भूमिका आहे. ज्या विषयात माहिती नाही. त्या विषयात केवळ प्रसिद्धीसाठी काहीही बोलू नये. असा टोला देखील अमित गोरखे यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे. तिसरा अहवाल आज संध्याकाळी पर्यंत येण्याची शक्यता आहे. हा अहवाल देखील भिसे कुटुंबाच्या बाजूने लागेल असा विश्वास आहे.