पिंपरी- चिंचवड: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनीषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल आल्याचे बोलले जात आहे. या अहवालात डॉ. घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट दिल्याचं सांगितलं जातं आहे. यावर आमदार अमित गोरखे यांनी प्रतिक्रिया दिली असून रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळ पर्यंत सर्व काही चित्र स्पष्ट होईल. असं म्हणत अद्यापही अमित गोरखे यांनी भिसे कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.अमित गोरखे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. डॉ.घैसास यांना देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाविषयी देखील त्यांनी भाष्य केले आहे.

अमित गोरखे म्हणाले, ससून रुग्णालयाचा आलेला अहवाल हा माझ्यापर्यंत आलेला नाही. तो अहवाल आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येईल अशी अपेक्षा आहे. उद्याच सर्व काही चित्र स्पष्ट होईल. भिसे कुटुंबीयांना अपेक्षित न्याय मिळेल असा विश्वास अमित गोरखे यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, या प्रकरणाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वैयक्तिकरित्या लक्ष देऊन आहेत. पुढे ते म्हणाले, डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ते पळून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या घराखाली पोलीस थांबविण्यात आले आहेत. त्यांना कुठलं ही पोलीस संरक्षण देण्यात आलं नाही. असं पुणे पोलिसांनी मला सांगितलं आहे. अशी माहिती भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे.