केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. “सहकार हे एकमेव क्षेत्र प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पोहचले आहे,” असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं.
अजित पवार म्हणाले, “सहकार हे एकमेव क्षेत्र प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पोहचले आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी सहकार विभागाने योगदान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला. देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह यांनी याचे नेतृत्व सांभाळलं आहे.”
हेही वाचा : “…ही दंगली भडकवण्याची सुपारी आहे”, संजय राऊतांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल
“सहकारातून समृद्धी अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. त्या घोषणेअंतर्गत अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंत्रालय काम करत आहे. याला आमचा पाठिंबा असेल, असा विश्वास मी अमित शाह यांना देतो,” असं अजित पवार यांनी म्हटलं.
“अमित शाह हे गुजरातमधून येतात. पण, त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावाई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे,” असेही अजित पवार यांनी सांगितलं.