पुणे : निवडणुका एकत्रित लढविल्या. फलकावर आपल्यापेक्षाही मोठ्या आकारामध्ये नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावून मते मागितली. मात्र, मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधकांचे तळवे चाटले. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी आणि शिवसैनिकांशी द्रोह केला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने त्यांना सत्य कळले असेल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून शनिवारी टीका केली. राज्यातील सर्व जागा युतीला मिळतील असा संकल्प करताना धोका देतात त्यांना कधी सोडायचं नाही, अशी टिप्पणी करत शहा यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने ‘मोदी @ २०’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय संघटना मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुस्तकाच्या अनुवाद प्रकल्पाचे समन्वयक माधव भंडारी आणि राजहंस प्रकाशनचे आनंद हर्डीकर या वेळी उपस्थित होते. या पुस्तकात प्रथम गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांच्या २० वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश आहे.
हेही वाचा- अमित शाहांकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठं भाष्य, म्हणाले “या निकालाने…”
शहा म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे सरकार चांगले काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या सरकारला भक्कम पाठिंबा आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली भावना मी पाहिली. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तारण असलेले धनुष्यबाण मी सोडवून आणला’, ही शिंदे यांची भावना सामान्य शिवसैनिकाची होती. फडणवीस आणि शिंदे यांनी भ्रष्ट सरकारच्या जागी लोकभिमुख सरकार देण्याचे काम केले. भाजप-शिवसेना भक्कम युती राज्याला प्रगतीपथावर नेईल.
मोदी यांचा संघर्षमय प्रवास उलगडताना शहा म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूकही न लढलेल्या मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये सर्वसमावेशक विकास केला. धोरण लकव्यामध्ये अडकलेल्या संयुक्त पुरोगामी सरकारच्या कालखंडानंतर मोदींच्या नावाची घोषणा झाल्यावर निवडणुका आनंदाची लहर आली. २०१४ ते २०२२ या कालखंडात भारतात परिवर्तन दिसून आले. करोना काळात त्यांनी निडर सेनापती होऊन देशाचे नेतृत्व केले. उरी हल्ला झाल्यावर तिसऱ्याच दिवशी लक्ष्यभेद करत पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादी तळ उद्धस्त केले.