पुणे : शिरूर लोकसभेची निवडणूक पक्षनिष्ठेविरोधात बेडूकउड्या या पद्धतीची आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात वीस वर्षे टोकाचा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन कसे होणार, असा सवाल शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
डाॅ. कोल्हे यांची राजगुरूनगर येथे पत्रकार परिषद झाली. त्यात ते बोलत होते. मतदारसंघातील विकासकामांबाबत समाेरासमोर बसून चर्चेस तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले. शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना डाॅ. कोल्हे म्हणाले, की आढळराव नाईलाजाचे उमेदवार ठरले आहेत. महायुतीकडे माझ्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी ताकदीचा उमेदवार नाही. वीस वर्षे आढळरावांविरोधात टोकाचा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन निवडणुकीच्या निमित्ताने होणार का, हा प्रश्न कायम राहणार आहे. आढळराव यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीची तुलना माझ्या पाच वर्षांतील कारकिर्दीशी करणे अयोग्य आहे. राजकारण हा माझा पिंड नाही, हा दावा अजित पवार यांनी संदर्भासह स्पष्ट करावा.
हेही वाचा – ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…
हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली
मोदी सरकार प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक हा त्याचाच भाग आहे. मात्र, आगामी निवडणुकीत भाजपचे सरकार येणार नाही, याची खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले.