पिंपरी चिंचवडमध्ये नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी गुलाबी रंगाच्या जॅकेटवरून अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. विशेष म्हणजे यावेळी अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची नक्कलही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणजे अमोल कोल्हे?

महात्मा गांधी यांच्या माकडांचे शिल्प अनेकांना माहिती आहे. ‘बुरा मत बोलो’, ‘बुरा मत सुनो’ आणि ‘बुरा मत देखा’, असा संदेश ते देतात. मात्र, याऐवजी महाराष्ट्रात वेगळंच चित्र आहे. ‘चांगले बोलू नका’, ‘चांगले ऐकू नका’ आणि ‘चांगले बघू नका’, अशा प्रवृत्ती महाराष्ट्रात दिसत आहेत. अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली. हे सांगतानाच त्यांनी अजित पवारांची नक्कलही केली. चांगले बोलू नका म्हणजेच “कसा निवडून येतो बघतोच तुला”, अशी म्हणत त्यांनी अजित पवारांची नक्कल केली. यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंचं मोठं विधान

गुलाबी जॅकेटवरून अजित पवारांना लगावला टोला

यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी गुलाबी रंगाच्या जॅकेटवरून अजित पवार यांना लक्ष्य केलं. पिंपरी चिंचवडमध्ये कुणाचातरी मेळावा आहे, असे असं म्हणतात, पण मला असं कळलं की हा मेळावा पिंपरी चिंचवड येथे नसून जयपूरला आहे, कारण ती गुलाबी सिटी आहे, असा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना, कुणी कुठला रंग वापरावा याविषयी कुणाचं दुमत नाही. फक्त तो गुलाबी रंग पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा केवळ राजकीय व्यासपीठावर दिसू नये, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – Manoj Jarange : मनोज जरांगे अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंवर संतापले “मराठ्यांची मतं घेईपर्यंत गोड…”

विविध योजनांवरून राज्य सरकावर टीका

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ४६ कोटी रुपयांच्या तरतूद केली आहे. बहिणींना त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे, याविषयी दुमत नाही. मात्र, १५०० रुपये महिन्यात काय भागतं? असा प्रश्न आता बहिणीच विचारत आहेत. या सरकारने लाडका भाऊ या योजनेचीदेखील घोषणा केली आहे. मात्र, ती मुख्यमंत्री रोजगार योजना आहे. त्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेनुसार तरुणांना केवळ सहा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून पगार देण्यात येणार आहे. त्यानंतर त्या तरुणांचे काय? त्यांच्या भविष्याच्या रोजगारांचं का? याबाबत सरकार काहीही बोलत, अशी टीकाही अमोल कोल्हे यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol kolhe mimicry of ajit pawar in pimpari chinchwad ncp program criticized pink jacket spb
Show comments