पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी ही मागणी फेटाळली, मात्र पीडीसीसी आणि भैरवनाथ पतसंस्थांच्या शाखा असलेल्या ठिकाणी पोलीसांची गस्त असणार आहे. तसेच कार्यालयीन वेळ झाल्यानंतर शाखा बंद करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या पूर्वसंध्येला बँकेची वेल्हे येथील शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या पार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप होण्याची भीती व्यक्त करत डॉ. कोल्हे यांनी शिरूरमधील पीडीसीसी आणि भैरवनाथ पतसंस्थेच्या सर्व शाखांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली होती.

हेही वाचा…“खरे गद्दार श्रीरंग बारणे; दोन वेळेस ज्या पक्षाने खासदार बनवले त्याला…”, संजोग वाघेरेंची टीका

‘कोल्हे यांच्या मागणीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. पीडीसीसी आणि भैरवनाथ पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याएवढे मनुष्यबळ नाही. त्यामुळे ही मागणी पूर्ण करता येणार नाही. मात्र, पोलिसांकडून या दोन्ही आस्थापनांच्या प्रत्येक शाखेच्या परिसरात पोलिसांची गस्त सातत्याने असेल, असे कळविण्यात आले आहे. तसेच मी स्वत: बँका, पतसंस्था यांना कार्यालयीन वेळेनंतर शाखा बंद करावी, असे आदेश दिले आहेत,’ असे शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol kolhe s demand for police security at pdcc bank and shivajirao adhalrao patil s credit union branches in shirur constituency rejected pune print news psg 17 psg
Show comments