राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मोफत तिकीट दिलं नाही म्हणून नाटक कसं होतं बघतो अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचा प्रयोग झाल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेक्षकांसमोर येत ही घटना सांगितली. तसेच याचे व्हिडीओ ट्वीट करत माहिती दिली.
अमोल कोल्हे म्हणाले, “प्रामाणिकपणे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, आतापर्यंत संभाजीनगर, नाशिक, निपाणी, कोल्हापूर, कराड या प्रत्येक ठिकाणी पोलीस बांधवांनी प्रचंड सहकार्य केलं. नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी तर २ हजार ५०० पोलीस बांधवांना त्यांच्या कुटुंबासह या महानाटकाचं तिकिट काढून दाखवलं. मात्र, आज मी खेदाची बाब शेअर करण्यासाठी आलो आहे.”
“पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला”
“आज पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला आहे. मी त्या पोलीस बांधवांचं नाव सांगणार नाही. कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. ही प्रवृत्ती नाटकाचे मोफत तिकिट मागण्याची आहे. अगदी शेवटी ३०० रुपयांचं तिकिट काढून आपल्या लेकरांना संभाजीमहाराजांचा इतिहास दाखवायला आलेल्या प्रत्येक पालकाचे मी आभार मानतो,” असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
व्हिडीओ पाहा :
“मोफत तिकीट मागणाऱ्या प्रवृत्तीला मी एवढंच सांगतो की…”
अमोल कोल्हे पुढे म्हणाले, “मोफत तिकीट मागणाऱ्या प्रवृत्तीला मी एवढंच सांगतो की, इथं बसलेले सर्वजण कराचे पैसे देतात आणि त्या करातून पोलिसांना महिन्याचा पगार मिळतो. असं असूनही छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी हे मोफत तिकिट मागतात. तसेच मोफत तिकिट दिलं नाही, तर नाटक कसं होतं ते बघतो असं म्हणतात.”
“पोलीस दलाच्या उज्वल परंपरेला क्षुल्लक कारणासाठी गालबोट लावू नका”
“माझी हात जोडून विनंती आहे की, पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे. २६/११ च्यावेळी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलं, कोविड काळात ज्यांनी प्राणांची पर्वा न करता रस्त्यावर होते. त्यामुळे इथं बसलेल्या त्या पोलीस बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा पोलीस दलाच्या उज्वल परंपरेला क्षुल्लक कारणासाठी गालबोट लावू नका. मी जाणीवपूर्वक तुमचं नाव घेत नाहीये,” असंही अमोल कोल्हेंनी नमूद केलं.