लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. महाराष्ट्रात पक्षफुटी, बंडखोरी या गोष्टींचा निवडणुकीवर परिणाम होईल असा अंदाज बांधण्यात आला होता. यासह बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या विषयांना विरोधी पक्षांनी प्रचारात मांडत राज्य सरकारला घेरले होते. कदाचित या गोष्टी काही प्रमाणात महाविकास आघाडीला फायदेशीर ठरत असल्याचे दिसत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे हे दुसऱ्या फेरीत आघाडीवर असल्याचे दिसून आले. यावर अमोल कोल्हे यांनी एबीपी माझ्याच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिले होते. त्यावर विचारले असता, सर्वसामान्य कार्यकर्त्याची मेहनत, तसेच जनतेने जो विश्वास दाखवला त्याचे प्रतिबिंब या निकालातून दिसून येत आहेत. आव्हाण कुणीही दिले तरी मतदान शिरून लोकसभा मतदारसंघातील जनता करणार होती आणि जनतेने तुतारीला साथ दिली, असे समाधान अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
शिरूरप्रमाणे बारामतीत सुप्रिया सुळे पहिल्या फेरीत आघाडीवर दिसत असल्याच्या वृत्तावर त्यांनी आनंद व्यक्त केला. मी १८ ठिकाणी सभा घेतल्या. महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कल असल्याचे दिसले. काही ठिकाणी लक्ष्मीचे दर्शन, प्रशासनाच्या बाबतीत काही गोष्टी समोर आल्या. इतकं असताना जनतेचा आवाज दाबला जात नाही, हे दिसून आले, असे अमोल कोल्हे म्हणाले.
काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी बंडखोरी करत आपल्या नेत्यांची वेगळी फळी उभी केली होती. हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पथ्यावर पडतंय असं वाटतं का यावर, कुटुंब फुटणे ही गोष्ट योग्य नाही. मात्र विपरित परिस्थितीत शरद पवार यांनी जो संघर्ष उभा केला तो दाद देण्यासारखा आहे. वादळ छातीवर झेलण्याची ताकद शरद पवारांनी दाखवली, असे कौतुक अमोल कोल्हे यांनी केले.