लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढली आहे. त्यांची आणि कुटुंबीयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे आठ कोटी ४२ लाख रुपये एवढी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच सन २०१९ मध्ये त्यांची मालमत्ता सुमारे साडेचार कोटी रुपयांची होती.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. कोल्हे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. कोल्हे यांच्याकडे ४० हजार रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे २५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. कोल्हे यांच्याकडे पजेरो ही चारचाकी, तर बुलेट ही दुचाकी आहे. त्यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (कोल्हेमळा) येथे शेतजमीन आहे, तर पुणे जिल्ह्यात नारायणगाव, मुंबईतील परळ आणि भोईवाडा, नाशिकमध्ये देवळाली येथे सदनिका आहेत. यापैकी भोईवाडा आणि नाशिक येथील सदनिका खासदार झाल्यानंतर खरेदी केल्या आहेत.

आणखी वाचा-आमदार झाल्यावर रवींद्र धंगेकरांच्या मालमत्तेत घट… किती आहे मालमत्ता?

कोल्हे यांच्यावर दोन कोटी ९९ लाख ६५ हजार ५४२ रुपयांचे कर्ज आहे. कोल्हे यांच्याकडे ८२ लाख ३९ हजार ५०५ रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे ४८ लाख २९ हजार दहा रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर कोल्हे यांच्याकडे तीन कोटी ६० लाख २५ हजार २३६ रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे तीन कोटी ५१ लाख १३ हजार ५०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Story img Loader