आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना इशारा दिला आहे. पुण्यातील कोणता आमदार किती वाजता कुठे जातो, कुठे बसतो, कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली अजित पवार यांच्याकडे आहे, असं म्हणत त्यांनी हा इशारा दिला. तसेच त्यांबाबतीत बोलताना जरा जपून आणि सांभाळून बोलावं, असंही म्हटलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
अमोल मिटकरी म्हणाले, “पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कुठे जातो, कुठे बसतो, कोणत्या हॉटेलमध्ये असतो काय काय करतो ही सर्व कुंडली अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतीत बोलताना जरा जपून आणि सांभाळून बोलावं.”
“व्यक्ती पाहूनच अजित पवार वेळ देत असतात”
“अजित पवार यांना जेवढा प्रशासकीय अनुभव आहे तेवढा यायला तुम्हाला अनेक वर्षे खपावं लागेल. मात्र, कोणाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन अजित पवार यांच्याकडे असतं. त्यामुळे व्यक्ती पाहूनच अजित पवार वेळ देत असतात, हे सूर्याइतकं स्पष्ट आहे,” असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
“अजित पवार माणसं पाहूनच वेळ देतात”
अमोल मिटकरी म्हणाले, “काही लोकांच व्यथा आहे की आम्हाला विश्वासात घेत नाही. मला वाटतं अजित पवार यांचा जेवढा राजकीय अनुभव आहे तो पाहता कोणत्या माणसाला किती वेळ द्यायचा हे त्यांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील कितीवेळी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे जातात आणि त्यांच्याशी बोलतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल, मात्र चंद्रकांत पाटलांना किती वेळ द्यावा हे अजित पवार यांना माहिती आहे.”
हेही वाचा : “ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही”, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यांवर अजित पवार संतापले, म्हणाले…
“चंद्रकांत पाटील यांचे अलिकडे काही वैफल्यग्रस्त विधानं येत आहेत. ते सध्या काहीही गप्पा करतात, काहीही बोलतात. त्यामुळे अशा निरर्थक व्यक्तींना वेळ देऊन अजित पवार यांना प्रशासकीय वेळ वाया घालवायचा नसेन. शेवटी ते म्हणतात भिंतीला सांगायचं का? मराठीत एक म्हण आहे की भिंतीलाही कान असतात. त्याचप्रमाणे अजित पवार यांचे कान जेवढे तीक्ष्ण आहेत, तेवढीच नजरही तीक्ष्ण आहे,” असंही मिटकरींनी नमूद केलं.