रात्र कधी एका क्षणात येत नाही तशीच दडपशाहीसुद्धा हळूहळू पसरत जाते. या दोन्ही घटनांमध्ये संध्याकाल हा सामायिक असतो आणि त्याच काळी हवेतल्या बदलाची चाहूल घेत आपण जास्तीत जास्त जागरूक राहिलो नाही . २०१४ आधीचा संध्याकाल ओळखायला आपण चुकलो. परिणामी आपण अंधाराचे बळी झालो आहोत. दहशतवादाच्या विळख्यात सापडलो आहोत. अंधार राज्यात अज्ञानाचं राज्य नसेल तरच नवल. अंधार हे राजकीय हत्यार पद्धतशीरपणे आपल्यावर सातत्याने चालवलं जात आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी वास्तवावर परखड भाष्य केले.
महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे साधना ट्रस्ट संचालित कार्यक्रमात पालेकर यांच्या हस्ते शांता गोखले यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार आणि आनंदवन संस्थेला समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. विकास आमटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला, त्या प्रसंगी पालेकर बोलत होते. पंजाबमधील तर्कशील सोसायटीला प्रदान करण्यात आलेला डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार सोसायटीचे अध्यक्ष राजिंदर भदौठ यांनी स्वीकारला. कथालेखिका सानिया, नाटय़लेखक राजीव नाईक, कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांना साहित्य, तर अॅड. निशा शिवूरकर आणि मतीन भोसले यांना कार्यकर्ता पुरस्कार तसेच हरी नरके यांना समाजप्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुश कर्णिक, प्रवर्तक सुनील देशमुख, साधना ट्रस्टचे डॉ. हमीद दाभोलकर या वेळी उपस्थित होते.
पालेकर म्हणाले,की हजारो वर्षांपूर्वी हत्तीचे डोके मनुष्याच्या धडाला जोडले याचा अर्थ आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात आहे यापासून ते वेदांमध्ये अधिक चांगले सिद्धांत आहेत असा अज्ञानाचा अखंड मारा आपल्यावर सुरू आहे. आधाराविना इतिहासामध्ये बदल करण्यापासून ते अवमानकारक मिथके आणि असत्य पसरवण्यापर्यंत बौद्धिक हननाची विविध रूपे सर्वत्र दिसत आहेत. टाटा सामाजिक संस्थेत दलित-अन्य मागासवर्ग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद झाली. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाविरुद्ध हल्ले सुरू झाले. शिक्षण महाग झाल्यामुळे अनेक जण शिक्षणापासून वंचित होत आहेत. अंधार गडद करण्यासाठी डोळ्यांवर पट्टय़ा बांधल्या जात आहेत. त्या पट्टय़ा दूर करू पाहणाऱ्या विचारवंतांच्या हत्या झाल्या आणि त्याचा तपास आजही लागत नाही. लेखकांना निर्भयपणे लिहिता येत नाही. राष्ट्रगीत, झेंडे, सणांचे स्तोम, भव्य पुतळे, जाहिराती आणि फलक अशा दैनंदिन जीवनातील उदाहरणे घेऊन राजकीय आणि सांस्कृतिक दहशतीचा नवा अवतार असून अदृश्य फौजांचे हल्ले सुरू ठेवले जात आहेत. पुढे काय? तर, २०१९ च्या निवडणुकीत डोळे उघडे ठेवून अंधारनीतीचा भेद करीत मतदान करणे आपल्या हातात आहे. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. विनोद शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. विकास आमटे म्हणाले..
ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येइतके म्हणजे १ कोटी २३ लाख कुष्ठरूग्ण असताना भारत सरकारने कुष्ठरोग विभाग बंद केला आहे. महारोग ही शिवी समजली जाते. आनंदवनद्वारे विस्थापितांना प्रस्थापित करण्याचे काम केले जात आहे.
शांता गोखले म्हणाल्या..
अनुवाद करताना प्रत्येक शब्दाशी, वाक्याशी झगडून संबंधित साहित्यकृतीचा आवाज आणि बाज कायम ठेवून ती साहित्यकृती इंग्रजीमध्ये बोलली पाहिजे हा कटाक्ष ठेवते. अनुवादाबाबत वाचकांइतकेच लेखकही उदासीन असतात.