हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नट आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी मंगळवारी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. पालेकर याठिकाणी त्यांच्या ‘दायरा’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यांनी यापूर्वीही एफटीआयआयच्या अध्यक्षपदावर गजेंद्र चौहानांच्या नियुक्तीला विरोध दर्शवत सरकारला खडे बोल सुनावले होते. एफटीआयआयला वेळ देण्यासाठी जो कोणी सध्या उपलब्ध आणि बेकार आहे, त्याची नियुक्ती करायची हाच सरकारचा निकष आहे का, असा उपरोधिक सवाल पालेकर यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, कालच अमोल पालेकर यांची भारतातील ऑस्कर ज्युरी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे पालेकर यांच्या आजच्या एफटीआआयमधील विद्यार्थ्यांशी होणाऱ्या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
संस्थेच्या अध्यक्षपदी भाजपच्या गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आल्याविरोधात गेल्या ७५ दिवसांपासून विद्यार्थ्यांनी एफटीआयआयमध्ये आंदोलन पुकारले आहे. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरली होती. दरम्यान, शुक्रवारी केंद्राच्या त्रिसदस्यीय समितीने संस्थेला भेट दिल्यामुळे येथील वातावरण पालटले आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना झालेल्या अटकेनंतर संस्थेच्या प्रांगणात बरे वातावरण नव्हते. याबाबत आम्ही समितीस सांगितले. समितीने आमचे म्हणणे ऐकून घेतले. एफटीआयआय सोसायटीचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली, परंतु २००८ सालच्या विद्यार्थ्यांच्या मुद्दय़ावर विशेष चर्चा झाली नाही. आता सरकार या संस्थेस अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल असे वाटते.
समितीने आपले म्हणणे ऐकून घेण्यात रस दाखवल्यामुळे संपाची कोंडी लवकरच फुटेल, अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. या समितीचा अहवाल सोमवारी मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा