पुणे : खेड शिवापूर टोलनाका परिसरात नाकाबंदीत जप्त केलेली पाच कोटी रुपयांची रक्कम प्राप्तीकर विभागाकडे जमा केली आहे. पंचासमक्ष रोकड मोजण्यात आली आहे. निवडणूक आयोग, प्राप्तीकर विभाग, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सोमवारी सायंकाळी ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदीत मोटारीची तपासणी केली. तेव्हा मोटारीत मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी मोटारचालकासह चौघांची चौकशी सुरू केली, तसेच रोकड जप्त केली. पंचासमक्ष रोकड मोजण्यात आली. राजगड पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिसानी जप्त केलेली रोकड पाच कोटी रुपये असल्याचे मोजणीत उघड झाले. ही रक्कम एका बांधकाम ठेकेदाराची असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा >>>अजित पवार येत्या सोमवारी अर्ज दाखल करणार; बारामतीत काकापुतण्यामध्ये लढतीची शक्यता

याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे. जप्त केलेली पाच कोटींची रक्कम प्राप्तीकर विभागाकडे देण्यात येणार आहे. मोटारचालकासह चौघांची चौकशी करण्यात येत आहे. निवडणूक आयोग आणि प्राप्तीकर विभागाच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी नमूद केले.

चौकशीनंतर चौघांना सोडले

मोटारीतून पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर चालकासह चौघांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले असून, जप्त केलेली रोकड प्राप्तीकर विभागाकडे जमा करण्यात आली आहे. संबधित मोटार संदीप नलावडे यांच्या मालकीची आहे. मात्र, मोटारीची विक्री बाळासाहेब आसबे यांना करण्यात आली, असा दावा चौकशीत करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>ऑक्सफर्ड विद्यापीठात आता मराठीचे धडे

‘बापूं’शी संबंधित

मोटारीतून पाच कोटी रुपये जप्त करण्यात आल्यानंतर या घटनेची नोंद पोलिसांनी (स्टेशन डायरीत) केली आहे. मोटारीतून सागर पाटील, रफीक नदाफ, बाळासाहेब आसबे, शशिकांत कोळी ( रा. सांगोला) प्रवास करत हाेते, अशी नोंद करण्यात आली आहे. चौकशी करण्यात आलेला एक जण सांगोल्यातील एका राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे.