राज्यात दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा टक्का सलग तीन वर्षे दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढला आहे. यंदा राज्यात ८५ टक्के जागांवर प्रवेश झाले असून, सर्वाधिक ९१ टक्के प्रवेश अमरावती विभागात झाले.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची २०२२-२३ या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या सन २०१८-१९ मध्ये ४१ टक्के, २०१९-२०मध्ये ५० टक्के, २०२०-२१ मध्ये ६० टक्के, २०२१-२२ मध्ये ७० टक्के होती. तर यंदा ८५ टक्के प्रवेश झाले. यंदा पदविका अभ्यासक्रमांसाठी जवळपास १ लाख जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी एकूण ८४ हजार ४५२ विद्यार्थ्यांची प्रवेश घेतला. विभागनिहाय आकडेवारीमध्ये अमरावती विभागात ९१ टक्के, औरंगाबाद विभाग ८६ टक्के, मुंबई विभाग ८२ टक्के, नागपूर विभाग ६८ टक्के, नाशिक विभाग ७८ टक्के आणि पुणे विभाग ९० टक्के असे प्रवेश झाले.
हेही वाचा >>> अजित पवार चंद्रकांत पाटील यांना म्हणाले “विनाशकाले विपरीत बुद्धी…” कारण…
तंत्रशिक्षणातील पदविका हा रोजगारक्षम अभ्यासक्रम म्हणून एक उत्तम पर्याय ठरत आहे. शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थांचा ओघ या क्षेत्राकडे वाढला आहे. पदविका अभ्यासक्रम प्रवेशाचा चढता आलेख कायम ठेवावा, असे आवाहन पाटील यांनी केले.