मागील दोन वर्षांपासून किताबासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या अमरावतीच्या माऊली जमदाडेला पुन्हा एकदा अपयश आले. येथे सुरु असलेल्या ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माऊलीला आपलाच सराव सहकारी सिकंदर शेखकडून गुणांवर पराभव पत्करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : अतिरिक्त कलागुण प्रस्तावांसाठी मुदतवाढ

कोथरुड परिसरात खास उभारलेल्या स्व. मामासाहेब मोहोळ कुस्ती मैदानावर या लढती सुरू आहेत. यंदाच्या संभाव्या विजेतेपदाच्या शर्यतीत सिंकदर आणि माऊलीला समान संधी होती. कोल्हापूरला गंगावेस तालमीत एकाच वस्तादाकडे सराव करणाऱ्या या दोन मित्रांमधील लढतीची सुरुवात आक्रमक झाली. दुहेरीपटाचा डाव करत माऊलीने पहिल्याच प्रयत्नांत एकत्रित चार गुणांची कमाई करून चुणूक दाखवली. माऊली सातत्याने दुहेरी पटाचा डाव खेळण्याच्या तयारीत दिसल्यावर सिकंदरने बचावात्मक पवित्रा घेत त्याच्या डावाला प्रतिडावाने उत्तर दिले. माऊलीवर ताबा मिळवत सिंकदरने आपली गुणसंख्या वाढवत अखेरचे मिनिट असताना आघाडी मिळवली आणि नंतर ती टिकवून ठेवत आपल्या किताबी मोहिमेचा यशस्वी श्रीगणेशा केला.

माजी विजेता हर्षवर्धन सदगीरनेही विजयी सुरुवात करताना नगरच्या सुदर्शन कोतकरला गुणांवर पराभूत केली. केसरी गटातील आजच्या पहिल्या फेरीत फारसे धक्कादायक निकाल लागले नाहीत. कल्याणचा नरेश म्हात्रे, नागपूरच्या राकेश देशमुख, माती विभागात कोल्हापूरच्या शुभम शिदनाळे यांनी विजयी सलामी दिली.

हेही वाचा- पाकिस्तानमधून येणाऱ्या वाऱ्यांमुळे काश्मीरमध्ये बर्फ आणि महाराष्ट्रात थंडी

अन्य लढतीत ५७ किलो वजनी गटाच्या माती विभागात सोलापूरच्या सौरभ इंगवेने सुवर्णपदक, सांगलीच्या रोहित तामखेडेने रौप्य तर पुणे जिल्हा संघाच्या ओमकार निगडेने कांस्य पदक पटकावले. गादी विभागात बीडच्या आतिश तोडकरने सुवर्णपदक, कोल्हापूरच्या सुरज अस्वलेने रौप्यपदक तर कोल्हापूरच्या अतुल चेचर व पुण्याच्या विजय मोदर याना कांस्य पदक विभागून देण्यात आले.

हेही वाचा- निजामाबाद-पुणे, दौंड-भुसावळ रेल्वे गाड्या उद्यापासून रद्द; पुणे-नागपूर गाड्या बदललेल्या मार्गाने

८६ किलो गटात गादी प्रकारात पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगतापला सुवर्ण, तर उस्मानाबादच्या मुंतजीर सरनौबतला रौप्य तर सोलापूर शहरच्या एकनाथ बदरे व सतारच्या विजय डोईफोडे याना कांस्य पदक विभागून देण्यात आले. ८६ किलो माती विभागात भांडारा जिल्ह्याच्या अर्जुन काळेला सुवर्णपदक, वाशीमच्या सचिन पाटीलला रौप्य तर सोलापूर जिल्ह्याच्या राहुल काळेला रौप्यपदक देण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati wrestler mauli jamdade defeated in maharashtra kesari wrestling tournament pune print news dpb 28 dpj