पुणे : राज्य शासनाने एसटी प्रवासभाड्यात सवलत देणाऱ्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ आणि ‘महिला सन्मान योजना’ सुरू केल्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षांत दर वर्षी उत्पन्नाचा आलेख चढता राहिला असून, २०२२-२३ मध्ये १६२ कोटी, २०२३-२४ मध्ये ४२७ कोटी रुपये, तर एप्रिल २०२४ पासून गेल्या सात महिन्यांत ३४८ कोटी रुपये इतके उत्पन्न एसटीच्या पुणे विभागाला मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने २६ ऑगस्ट २०२२ पासून ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना राज्यभरात विनामूल्य प्रवासाची सवलत देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ सुरू केली. त्यानंतर १७ मार्च २०२३ पासून महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत देणारी ‘महिला सन्मान योजना’ सुरू झाली. या दोन्ही योजनांमुळे ‘लाल परी’तून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली. महिला सन्मान योजनेंतर्गत तब्बल चार कोटी महिलांनी प्रवास केला, तर ७५ वर्षांपुढील एक कोटी ज्येष्ठ नागरिकांनी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत एसटीच्या मोफत प्रवासाचा लाभ घेतला. या योजना सुरू झाल्यापासून गेल्या अडीच वर्षांत एकूण १३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून, पुणे विभागाला ९३८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.

हेही वाचा…पदपथ धोरण कागदावर, पादचारी आले ‘रस्त्यावर’

‘पुणे महामंडळाचे १४ आगर आहेत. त्यांपैकी प्रामुख्याने शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातून मुंबई, नागपूर, ठाणे, अकोला, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या एसटी बसची संख्या जास्त आहे. सन २०२२-२३ या वर्षात ३२९ ‘लाल परी’ रस्त्यावर धावल्या. यातून २ कोटी १२ लाख ९६ हजार प्रवाशांनी प्रवास केला. या काळात केवळ ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ सुरू होती. शिवाय, करोना प्रादुर्भावामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरणदेखील होते. तसेच, कर्मचाऱ्यांनी दोन-अडीच महिने संप पुकारल्यानेही उत्पन्नावर परिणाम झाला. सन २०२३-२४ या वर्षाच्या सुरुवातीलाच महिला सन्मान योजनेची भर पडल्याने एसटीच्या ६३२ फेऱ्या झाल्या, तर चालू वर्षात सात महिन्यांत ३२९ बस १४ आगरांतून सोडण्यात आल्या,’ अशी माहिती पुणे एसटी विभागाच्या सहायक वाहतूक अधीक्षक ए. एम. शेख यांनी दिली.

सवलत आणि उत्पन्नवाढ

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या योजनांत मिळणाऱ्या सवलतींमुळे प्रवासी संख्या वाढत असली, तरी तिकिटांतील फरक महामंडळाला अन्य स्रोतांतून भरून काढावा लागतो. या योजनांच्या बाबतीत बोलायचे, तर राज्य शासन सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती करते. गेल्या अडीच वर्षांत महामंडळाला प्रवासी भाड्यातून एकूण ७३१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले, तर २०७ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती राज्य शासनाने केली.

हेही वाचा…पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी

गेल्या तीन वर्षांतील ‘लाल परी’च्या उत्पन्नाचा आढावा (आकडे लाखांत)

वर्ष – एसटी संख्या – एकूण उत्पन्न – दिलेली सवलत – प्रवासी संख्या

२०२२-२३ – ३२८ – १६२५०.६२ – १३९७.७६ – २१२.९६

२०२३-२४ – ६३२ – ४२७६९.३८ – ७१७६.१४ – ६९८.८६

एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत

३२९ ३४८०८.३० १२१२८.५५ ४१६.८५

एकूण – १२८९ ९३८२८.३० २०७०२.४५ १३२८.६७

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrit jyeshtha nagarik yojna and mahila samman yojana led to increased st pune division revenue pune print news vvp 08 sud 02