पुणे : मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख लाभलेल्या अमृता खानविलकर हिच्याशी संवाद साधण्याची संधी ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहे. ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या गुरुवारी (७ मार्च) होणाऱ्या नव्या पर्वात मराठी चित्रपटसृष्टी ते हिंदीतील ‘राजी’ आणि ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांपर्यंतचा अमृताचा प्रवास उलगडणार आहे. ‘लागू बंधू’ आणि ‘परांजपे स्किम्स’ हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक असून ‘नोबल हॉस्पिटल’ हे ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ आहेत.
मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस, संवेदनशील आणि सक्षम अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरचे नाव घेतले जाते. मराठीमध्ये स्वतला सिद्ध केल्यानंतर तेवढय़ावर समाधान न मानता अमृताने हिंदी चित्रपट सृष्टी, रिअॅलिटी शो आणि वेबसीरीज सारख्या आधुनिक माध्यमांमध्येही स्वतची गुणवत्ता सिद्ध करून लोकप्रिय होण्याची किमया साधली आहे.
मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजी’ तसेच मिलाप झवेरी यांच्या ‘सत्यमेव जयते’ मधील अमृताच्या भूमिकांनी प्रेक्षक आणि परीक्षकांची वाहवा मिळवली आहे. ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात अमृता मधील संवेदनशील अभिनेत्री, तिचे मनस्वी व्यक्तिमत्त्व आदी अनेक पैलू उलगडणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने मनातील प्रश्न अमृताला विचारण्याची संधी देखील उपस्थितांना मिळणार आहे.
कधी : गुरूवार, ७ मार्च २०१९, सायं. ५.४५ वाजता
कुठे : हॉटेल श्रेयस, १२४२ बी, आपटे रस्ता, डेक्कन जिमखाना