दिलखुलास अमृताचा मनमोकळा संवाद
पुणे : यश डोक्यात गेल्याशिवाय तुम्ही आपटत नाही. एकदा आपटल्यानंतरच मग तुम्ही जमिनीवर येता. यश तुम्हाला भेदरून टाकते. वेड लावते. ही झिंग वेगळीच असते. त्यातून उभे राहण्याची ताकद असावी लागते. ही ताकद तुमच्यामधील आत्मविश्वासातून येते.. दिलखुलास अमृता खानविलकर हिने मनमोकळा संवाद साधताना नेमक्या शब्दांत आपला प्रवास गुरुवारी उलगडला.
‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या नव्या पर्वात जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अमृता खानविलकर हिने रसिकांशी संवाद साधताना मराठी आणि हिंदूी चित्रपटसृष्टी, रिअॅलिटी शो आणि वेबसीरीज या माध्यमातील प्रवास उलगडला. ‘लागू बंधू’ आणि ‘परांजपे स्किम्स’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक, तर ‘नोबल हॉस्पिटल’ हे ‘पॉवर्ड बाय पार्टनर होते. ‘केसरी’च्या झेलम चौबळ, ‘लागू बंधू’चे सारंग लागू आणि ‘परांजपे स्किम्स’च्या मीनल परांजपे या वेळी उपस्थित होत्या. रेश्मा राईकवार आणि भक्ती बिसुरे यांनी अमृताशी संवाद साधला.
पुण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. कॉन्टॅक्ट लेन्स विकल्या. कॉल सेंटरवर काम केले. ‘आपली मुलगी सुंदर आहे’, असे आई-बाबांना कधी वाटलेच नाही. ‘रिअलिटी शो’मध्ये पोहोचले. ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे माझे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले. कोणत्याच कामाला नाही म्हटले नाही. जाहिराती, हिंदूी मालिका, ‘एकापेक्षा एक’ असे सर्व काही केले, अशा शब्दांत अमृताने प्रवास उलगडला. अभिनेत्री म्हणून मी घडत आहे. सृजनशीलता विकसित करावी लागते. केवळ मेहनत करून चालत नाही, तर योग्य मार्गही सापडावा लागतो. पण, शिक्षण अर्धवट सोडून अभिनयाच्या प्रांतात येऊ नका, असा सल्ला तिने युवकांना दिला. नाटक करायला आवडेल, पण मला कोणत्याही प्रकारची घाई नाही. सगळे करून संपवायचे नाही, असेही तिने सांगितले.
‘वाजले की बारा’ गीताच्या लोकप्रियतेनंतर मी अनेक रंगमंचांवरून त्या गीतावर नृत्य केले. लावणी ही आपली लोककला आहे. पण, त्याकडे बघणारी नजर कशी आहे हे आपण ठरवू शकत नाही. पण, मला ग्लॅमरस असे म्हणण्यापेक्षा अभिनेत्री म्हणून का संबोधले जात नाही, असा प्रश्न अमृताने उपस्थित केला. ‘कटय़ार काळजात घुसली’नंतर मी काही काळ थांबले होते. ते थांबणं माझ्यासाठी माणूस म्हणून महत्त्वाचं होतं. ‘राजी’मधील ‘मुनीरा’च्या भूमिकेने सर्वाचे लक्ष वेधले गेले, असे तिने सांगितले.
‘मी टू’ कोणत्या क्षेत्रात नाही?
‘मी टू’ हे काय फक्त चित्रपटसृष्टीतच आहे का?, असा सवाल करीत हे सर्वच क्षेत्रात असल्याचे अमृताने सांगितले. ज्या कोणी बोलल्या त्या विचार करूनच बोलल्या असतील. खूप हिंमत लागते त्यासाठी. काही चुकीचे घडत असेल तर ऐकू नका आणि घडू देऊ नका, असे अमृता खानविलकर हिने सांगितले.