देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या जवानांचे समाजावर ऋण आहेत, या भावनेतूनच मी आपल्या भेटीसाठी आले आहे, अशी भावना व्यक्त करीत प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष हिने जिद्दी जवानांना अभिवादन केले. ‘ती फुलराणी’ नाटकातील गावरान ढंगातील गीत ठसक्यात सादर करून तिने जवानांना जिंकले. टाळ्यांचा गजर करीत धरीत जवानांनी तिच्या गाण्यावर ताल धरला.
सैनिक मित्र परिवारतर्फे खडकी येथील पॅराप्लेजिक सेंटर येथे रविवारी झालेल्या भाऊबीज कार्यक्रमास अमृता सुभाष आवर्जून उपस्थित होती. अनौपचारिक संवाद साधत प्रत्येक जवानास औक्षण करीत तिने पेढा भरविला. प्रतिकूलतेवर मात करून देशाच्या सीमांचे रक्षण करताना आलेल्या अपंगत्वावर उपचार घेणाऱ्या जवानांना अमृता सुभाष हिने वाकून नमस्कार केला, त्या वेळी जवान भारावून गेले. व्यग्र वेळापत्रकातून केवळ चार तासांसाठी पुण्यामध्ये आलेल्या अमृता सुभाष हिने जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच वारंवार भेटण्याची ग्वाही दिली.
एरवी कोणत्याही कार्यक्रमासाठी मान्यवरांना निमंत्रित करताना त्यांच्याकडून मानधनाची अपेक्षा केली जाते. अमृता सुभाष हिने जवानांसाठी वेळ दिला. एवढेच नव्हे तर, जवानांसाठी भाऊबीज म्हणून पॅराप्लेजिक सेंटरला देणगी दिली, असे सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ यांनी सांगितले. कर्नल डॉ. आर. के मुखर्जी यांनी स्वागत केले. मेजर बिश्त यांनी समारोप केला. कल्याणी सराफ, पल्लवी जाधव, मंगेश कुडले. गंधाली देशपांडे आणि गिरीश सरदेशपांडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जिद्दी जवानांना अमृता सुभाषचे अभिवादन
प्रतिकूलतेवर मात करून देशाच्या सीमांचे रक्षण करताना आलेल्या अपंगत्वावर उपचार घेणाऱ्या जवानांना अमृता सुभाष हिने वाकून नमस्कार केला, त्या वेळी जवान भारावून गेले.
First published on: 11-11-2013 at 02:50 IST
TOPICSप्रसंग
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta subhash salute to soldiers on occasion of bhaubeej