पुणे : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ अशी मुंबईची ओळख आहे. आजवर राज्यातील दूधसंघांच्या ताब्यात असलेल्या मुंबईच्या बाजारपेठेत आता अमूलने वर्चस्व मिळवले आहे. दररोजच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत अमूलचा वाटा ४० टक्क्यांवर गेला आहे. करोनानंतर अमूलने वेगाने केलेल्या व्यवसायव्याप्तीची राज्यातील दूध संघानी धास्ती घेतली असून राज्याच्या डेअरी उद्याोगापुढे तग धरण्याचे आव्हान आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दूध उद्याोगातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दररोज सरासरी ६० लाख लिटर दुधाची विक्री होते. त्यात मोठ्या आणि नामांकित डेअरींच्या पिशवीबंद दुधाचा वाटा ४० लाख लिटर आणि लहान दूध संघ व सुट्या दूध विक्रीचा वाटा २० लाख लिटर आहे. नामांकित डेअरींच्या पिशवीबंद दुधाच्या दररोजच्या ४० लाख लिटरमध्ये सर्वाधिक १६ लाख लिटर इतक्या दुधाचे वितरण ‘अमूल’कडून करण्यात येते.

अमूलनंतर गोकूळ नऊ लाख लिटर, वारणा, नंदिनी, मदर डेअरी आणि गोवर्धन (पराग) यांचे वितरण प्रत्येकी सरासरी दोन लाख लिटर आहे. महानंद, राजाराम बापू, प्रभात, गोविंद, कन्हैय्या, नेचर डिलाईट यांचे वितरण प्रत्येकी २५ ते ५० हजार लिटर आहे, सतर कात्रज, चितळे, राजहंस, कोयना, डोंगराई, ऊर्जा, हुतात्मा यांचे वितरण सरासरी १० ते १५ हजार लिटर इतके आहे.

हेही वाचा >>>राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?

करोनानंतर अमूलचा मुंबईच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेतील वाटा वेगाने वाढला आहे. आरे पाठोपाठ महानंद अडचणीत आली आहे. महानंदमध्येअमूलशी स्पर्धा करण्याची ताकद होती. पण, महानंदचा कारभार व्यावसायिक लोकांच्या हाती न देता, राजकीय लोकांच्या हातात दिला गेला. त्यामुळे महानंदचे दिवाळे निघाले, असे निरीक्षण दूध उद्याोगाचे अभ्यासक प्रकाश कुतवळ यांनी नोंदवले.

दरम्यान, मुंबईतील अमूलच्या उत्पादनांच्या विक्रीविषयी गुजरातमधील आणंद येथील कार्यालयाशी संपर्ध साधला असता, कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार देण्यात आला.

हेही वाचा >>> ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?

अमूलचा वाढता पसारा

●दही, ताक, लस्सी, सुगंधी दूध, तूप, बटर, पनीर, चीझ आदी पदार्थांच्या विक्रीतही अमूलचा वाटा ४० टक्क्यांहून जास्त.

●मुंबईत दररोज सुमारे पाच ते सहा लाख लिटर दही, ताक, लस्सीची विक्री होते, त्यात अमूलचा वाटा ३५ टक्क्यांवर आहे.

●पनीर, चीझच्या विक्रीत अमूलचा वाटा १५ टक्के.

●बटरच्या विक्रीत अमूलचे वर्चस्व, वाटा ८० टक्क्यांहून जास्त. मुंबईला महिन्याला होणाऱ्या २.५ हजार टन तुपाच्या विक्रीवर गोवर्धन डेअरीचे वर्चस्व.

राज्यातील खासगी, सहकारी दूधसंघामध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. घाऊक, किरकोळ विक्रेत्यांना भरमसाठ कमिशन दिले जाते, पण, ग्राहकांसाठी किमान व्रिक्री मूल्य कमी केले जात नाही. क्षमता मोठी असलेला राज्यातील दूध उद्याोग विस्कळीत असल्यामुळे तो अमूलच्या स्पर्धेत टिकाव धरू शकणार नाही.- प्रकाश कुतवळ, दूध उद्याोगाचे अभ्यासक

अमूल संस्थे अंतर्गत ३० वेगवेगळ्या सहसंस्था काम करतात. एकाच दर्जाची उत्पादने निर्माण करून अमूल या एकाच ब्रँडखाली विकली जातात. त्यामुळे अमूल हा देशातील सर्वांत मोठा आणि वेगाने वाढणारा ब्रँड आहे. अमूल याच वेगाने राज्यात वाढू लागला तर राज्यातील लहान- लहान खासगी, सहकारी दूधसंघ बंद पडतील.– अरुण नरके, माजी अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन, दिल्ली

अमूलच्या तुलनेत राज्यातील दूध संघाची उत्पादने दर्जात कुठेही कमी नाहीत. मात्र अमूल प्रचंड प्रमाणात जाहिरातींवर खर्च करते. या जाहिरातींमुळे अमूलच्या उत्पादनांच्या विक्रीत वेगाने वाढ होत आहे. राज्यातील लहान दूधसंघ अमूलच्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत.– भगवानराव पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दूधसंघ मर्यादित (कात्रज)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amul dominates the mumbai milk market amy