‘आमच्या पिढीचे प्रशासकीय आधिकारी चांगले काम करण्यामध्ये कमी पडल्यामुळे आज देशाला कुपोषण, दर्जाहीन शिक्षण अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे,’ अशी खंत केंद्रीय निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी मंगळवारी व्यक्त केली.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या सत्कार समारंभामध्ये गोपालस्वामी बोलत होते. या वेळी आंध्र प्रदेशचे विधानसभेचे आमदार डॉ. जयप्रकाश नारायण, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक राहुल कराड, इंटरनॅशनल लर्निग सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा पालकर, एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक डॉ. डी. पी. आपटे उपस्थित होते.
या वेळी भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना गोपालस्वामी म्हणाले, ‘प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना आम्ही कमी पडलो, मात्र तुम्ही असे करू नका. आपल्या व्यवस्थेमध्ये अनेक आव्हाने आहेत. राजकीय व्यक्तींच्या प्रभावाखाली येणे, आपल्यातल्या कमतरता त्यांना कळू देणे, राजकारण्यांकडे दुर्लक्ष करणे आणि जागरूक राहणे या गोष्टी कटाक्षाने टाळायला शिका. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे लक्षात ठेवा.’
या वेळी डॉ. नारायण म्हणाले, ‘प्रशासनात काम करताना आपण राजकारण्यांच्या हातचे बाहुले होणार नाही, याची प्रशासकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासक हे सर्वसामान्य जनतेचे खरे नेते असतात, जनतेला उत्तरे देण्यास ते बांधील आहेत. जनता प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे त्याचदृष्टीने पाहाते, याची जाणीव ठेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे.’

Story img Loader