पिंपरी चिंचवड: दत्तक मुलाने आई आणि वडिलांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. आई, वडील, बहीण आणि तिच्या पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिदायत अन्वर हुसैन शेख अस विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दत्तक मुलाचे नाव आहे. वडील अन्वर हुसैन शेख, आई शहाजहा शेख, बहीण शहनाज आणि तिचा पती सईद अनवर अन्सारी यांच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित हिदायतला आरोपी अन्वर शेख यांनी त्यांच्या सख्ख्या भावाकडून दत्तक घेतले होते. तेव्हा कागदपत्रांची पूर्तता झाली आहे अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. हिदायतला अन्वर यांनी केवळ सातवी पर्यंत शिक्षण घेण्यास मुभा दिली. त्यानंतर त्याला स्वतः च्या केशकर्तनलयात कामासाठी ठेवून घेतले. हिदायतला शिक्षणापासून वंचित ठेवले गेले . तो गेल्या काही वर्षांपासून केश कर्तनलयात काम करून मिळणारे पैसे वडील अन्वर यांच्याकडे द्यायचा. मध्यंतरी हिदायतच्या पायाला जखम झाली. त्यामुळे त्याला काम करता येत नव्हते. तसेच त्याचा विवाह देखील झालेला आहे. त्यामुळे वडील अन्वर, आई शहाजहा, बहीण हिदायतला मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करायचे. हाच मानसिक त्रास सहन न झाल्याने हिदायतने विषारी औषध घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.