चांदणी चौकात मुंबईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गिकेला पर्यायी रस्ता करण्यासाठी हॉटेल बंजारा हिल्स येथील टेकडी फोडण्यात येत आहे. हे काम तातडीने करण्यासाठी या ठिकाणी बुधवारी नियंत्रित स्फोट करण्यात आले. चांदणी चौकातील जुना पूल नोएडा येथील जुळ्या मनोऱ्यांप्रमाणे पाडण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी महामार्ग काही तास बंद करावा लागणार आहे.
हेही वाचा- मोदींच्या निर्णयांमुळे व्यवस्थेचे परिवर्तन! ; निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन
सुरुंग लावून खडक फोडला
पूल तोडताना साताऱ्याकडे जाणारी वाहतूक सुरू राहावी, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) पर्यायी रस्ता केला जात आहे. त्यासाठी जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने टेकडी फोडली जात आहे. मात्र, त्यात अधिक वेळ खर्ची पडत आहे. हे काम तातडीने करण्यासाठी बुधवारी कमी तीव्रतेचा सुरुंग लावून खडक फोडण्यात आला. यामुळे पर्यायी रस्ता लवकर होण्यास मदत होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- डेबिट, क्रेडिट कार्डाद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरणे शक्य ; नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय
मुंबईला जाण्यासाठी एकच पर्यायी मार्ग
दरम्यान, चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर १२ ते १५ तास वाहतुकीचा खोळंबा होणार आहे. सध्या कोथरूड, सातारा या रस्त्याने मुळशी, बावधन, मुंबईला जाण्यासाठी एकच पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. मात्र, मुंबई, मुळशी, पाषाण आणि बावधनकडून कोथरूड, साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. ही वाहतूक एकाच मार्गिकेने वळविल्यास वाहतूक कोंडी होईल, म्हणून पर्यायी मार्गिका तयार झाल्याशिवाय पूल पाडता येणे अशक्य आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.