लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नोकरी, व्यवसाय, रोजगारानिमित्त अनेकांनी स्थलांतर केले असले, तरी त्यांचे मतदान मूळगावी, दुसऱ्या मतदारसंघात असते. त्यामुळे अनेक मतदारांना कामावरून सुटी दिली जात नाही. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व आस्थापनांना खासगी, शासकीय संस्था, महामंडळे, उद्योग, व्यावसायिक आणि महामंडळाच्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे.

राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाचे कार्यासन अधिकारी शामकांत सोनावणे यांनी हे आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णालये, वैद्यकीय संस्था आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना सुटी देणे शक्य नाही. या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी. परवानगी देताना स्थानिक मतदारसंघातच ज्यांचे मतदान आहेत त्या मतदारांना मतदानासाठी दोन तासांची सवलत दिली जाईल, याची खात्री करून कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. ज्या मतदारांना आस्थापनांकडून मतदानासाठी कायद्यानुसार देण्यात आलेली सवलत दिली जाणार नाही, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा-तलाठी भरतीतील ५७४ उमेदवारांचे भविष्य टांगणीलाच, जाणून घ्या कारण

महाराष्ट्रात अशी सुटी राहील

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी- रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर
दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी- बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी- रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी- नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पूणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड
पाचव्या टप्प्यात २० मे रोजी- धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An appeal to complain to district administration if if not given leave for voting pune print news psg 17 mrj
Show comments