पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर अजित पवार समर्थकांकडून डेंगळे पुलाजवळील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून अजित पवार आणि शरद पवार गट आमने-सामने आले असून, कार्यालय बळकाविण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयीन दाद मागण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या ताब्यात देण्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.
त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटांनी एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाकडून अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला फोडण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. कार्यालयात झालेली तोडफोड आणि कार्यालयाचा ताबा घेण्याचा इशारा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय परिसरात गुरुवारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा >>>लोकसभेच्या तोंडावर पुणेकरांना गिफ्ट; म्हाडाकडून १७०० घरांची सोडत
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय तीन वर्षांपूर्वी नव्या जागेत सुरू करण्यात आले. त्या जागेचा करार पक्षाच्या नव्हे, तर शहराध्यक्ष म्हणून माझ्या नावावर आहे. करारनामा रजिस्टर असून, जागेचे भाडेही माझ्या बँक खात्यातून देण्यात येत आहे. त्यामुळे कार्यालयावर दावा करणे अयोग्य आहे. मात्र त्यानंतरही असा प्रयत्न झाल्यास पोलीस आणि न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही हा कार्यालयाचा ताबा कोणाकडे यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हा वाद मागे पडला होता. पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांनी मिळाल्यानंतर हा वाद पुन्हा सुरू झाला आहे.